आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांनी बनवली फक्त सध्या पाण्याच्या वापराने चालणारी हीटिंग सिस्टीम

मुंबई : ७ डिसेंबर – दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी दिल्ली ही भारतातील सर्वांत प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक आहे. सायन्स आणि इंजिनीअरिंग ब्रँचमधील टॉपर विद्यार्थ्यांची पहिली पसंती याच संस्थेला मिळते. या संस्थेच्या संकुलामध्ये सतत काहीनाकाही नवीन तंत्रज्ञानाचा शोध सुरू असतो, असं म्हटलं जातं. नुकत्याच समोर आलेल्या एक संशोधनामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आयआयटी दिल्लीतील एका टीमनं एक अशी हीटिंग सिस्टीम बनवली आहे ज्यामध्ये फक्त साध्या पाण्याचा वापर होतो. या सिस्टीममध्ये खाद्यपदार्थ आणि पेय गरम होतात.
ऑफिसमधले कर्मचारी, शेतकरी किंवा मजूर, सीमेवर सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सैनिक अशा प्रत्येकाला आपलं अन्न सोबत ठेवावं लागतं. हे अन्न किंवा पेय गरम करण्यासाठी आपल्याला वीज किंवा लाकडी कोळशाची गरज भासते. काहीवेळा दुर्गम भागांमध्ये वीज आणि कोळसा उपलब्ध होत नाही. परिणामी खाण्या-पिण्याची अडचण निर्माण होते. आयआयटी दिल्ली अनेक वर्षांपासून या समस्येवर काम करत होती. नव्यानं तयार करण्यात आलेल्या पावरलेस हीटिंग सिस्टीममुळे आयआयटी दिल्लीला या समस्येवर उपाय शोधण्यात यश आलं आहे.
ही एक अतिशय कमी किमतीची हीटिंग सिस्टम आहे. जी साध्या पाण्याच्या सहाय्यानं केव्हाही सक्रिय केली जाऊ शकते. तिला गरम करण्यासाठी किंवा उर्जा देण्यासाठी कोणतंही इंधन किंवा विजेची गरज नाही. कोणत्याही ठिकाणी ‘थर्मल हीटिंग सोल्युशन’ म्हणून ही सिस्टीम काम करू शकते. याला ‘पॉवरलेस हीटिंग तंत्रज्ञान’ म्हणतात. हे तंत्रज्ञान दुर्गम ठिकाणी विशेषतः ईशान्य भारतात उपयुक्त ठरेल. या भागात हीटिंग स्त्रोतांच्या अभावामुळे किंवा विजेच्या स्त्रोतांच्या अनिश्चित उपलब्धतेमुळे लोकांची गैरसोय होते. या लोकांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. आयआयटी दिल्लीतील डिझाईन विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. सुमेर सिंह यांनी त्यांच्या टीमसह रासायनिक ऊर्जेवर काम करणाऱ्या तंत्रानं हे ‘पॉवरलेस हीटिंग तंत्रज्ञान’ तयार केलं आहे.
या सिस्टीममधील अॅक्टिव्ह हीटिंग एलिमेंट्स हे पर्यावरणाला अनुकूल असलेली खनिजं आणि क्षारांचं मिश्रण आहेत. ते एक्झोथर्मिक ऊर्जा निर्माण करतात. जेव्हा हे घटक पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतात. यामुळे, कोणत्याही खाद्यपदार्थाचं किंवा पेयाचे तापमान 60 ते 70 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते. या हीटरचं वजन फक्त 50 ग्रॅम आहे. प्रत्येक हीटिंगनंतर याच्या हीटिंग पॅडमध्ये शिल्लक असलेल्या नैसर्गिक खनिजांची सहज विल्हेवाट लावता येते. ही खनिजं जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात आणि 100 टक्के बायोडिग्रेडेबल म्हणजेच विघटनशील आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे, सहजपणे पाण्याच्या मदतीनं अन्न गरम करता येईल. एवढंच नाही तर तुम्ही इन्स्टंट नूडल्स बनवू शकता आणि चहा, कॉफीसारखं कोणतंही पेय गरम करू शकता.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन अँड रीच-नेक्टारनं (एनईसीटीएआर) डॉ. सिंह आणि त्यांच्या टीमला असा फूड बॉक्स आणि लिक्विड कंटेनर विकसित करण्यास सांगितलं आहे. जे इलेक्ट्रिकलेस हीटिंग तंत्रज्ञानासह वापरता येईल. गरजेनुसार अन्न किंवा पेयं गरम करू शकणारं कंटेनर विकसित करण्यासाठी याचा वापर करता येईल.
ही उत्पादनं ईशान्य भागातील लष्करी कर्मचारी, पर्यटक आणि कार्यालयात जाणाऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरतील. हे नॉन-इलेक्ट्रिक हीटिंग तंत्रज्ञान जंगलातील लाकूड जाळण्याची गरज कमी करतं. त्यामुळे देशाच्या उत्तर-पूर्व भागांमध्ये एक मोठी समस्या असलेल्या जंगलातील आगीच्या घटना कमी होतील. आयआयटी दिल्लीनं तयार केलेल्या या प्रोटोटाइपवर यशस्वीरित्या चाचणी झाली आहे. आता अनेक फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्या हे तंत्रज्ञान बाजारात आणण्यास उत्सुक आहेत.
दिल्लीतील गुरुग्राम येथील स्पिन-ऑफ स्टार्टअप अँचियल टेक्नॉलॉजीज हे तंत्रज्ञान पुढे नेत आहे. त्यांनी भारतीय नौदल आणि काही खाद्य उत्पादन कंपन्यांना त्याचा पुरवठा सुरू केला आहे. या तंत्रज्ञानासाठी पेटंटही दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply