प्रतिबिंब…- मधुसूदन (मदन) पुराणिक

वारंवार आपले आरशातील प्रतिबिंब बघण्याचे एक वय असते. हे वय मात्र आपल्या नकळत सहजपणे निघून जाते. परंतु स्त्रिया, मग त्या कितीही वयाच्या असो, स्वतःला आरशात वारंवार बघण्याचा मोह त्या टाळू शकत नाही. आताशा तर अनेक स्त्रियांच्या पर्समध्ये टिकल्या, नेलपॉलिश, केस विंचरण्याचा ब्रश, लिपस्टिक आणि आतिशय महत्वाचा असा आरसा हा हमखास असतोच. स्त्री आणि सौंदर्य ह्यांचे नाते समजून घेणारी एकमेव वस्तू म्हणजे म्हणजे आरसा.

पूर्वी माणसाचा आरशाशी संबंध फारच क्वचित यायचा, म्हणजे केसाचा नीट भांग पडला की नाही एवढंच बघण्यापूरता. परंतु आतातर पुरुषांच्या सवयीही बदलायला लागलेल्या आहेत. आपलंही सौंदर्य अधिक खुलून दिसावं असं त्यालाही वाटायला लागलं. त्यासाठी ते केशकर्तनालयामध्ये, माफ करा सलूनमध्ये, जाऊन आपले रुप अधिक मोहक व्हावे यासाठी वाटेल तेवढे रुपयेसुद्धा खर्च करु लागलेले आहेत आणि सलूनमधील आरशातील आपले प्रतिबिंब बघून कर्तनकाराला तो आवश्यक तेवढ्या सूचनाही करताना दिसत आहेत.

आरसा आपल्या प्रत्येकाचे प्रतिबिंब त्यात दाखवतो. त्यात चेहरा दाखवतो, सौंदर्य दाखवतो तसेच चेहऱ्यारील भावही सहजतेने आपल्याला कळवून देतो. परंतु त्या प्रतिबिंबातील भाव खरे की खोटे एवढे मात्र नाही सांगू शकत. ह्याबद्दल तो मूक होतो किंवा तटस्थ होतो असंही म्हणता येईल

प्रतिबिंब हे जसं आरशातून दिसतं तसं ते पाण्यातूनही दिसतं. पुराणकाळातील आख्यायिकांमधून एखाद्या राजकुमाराचं एखाद्या राजकुमारीवर किंवा सौदर्यवतीवरील प्रेम हे त्याने तिच्या सरोवराच्या पाण्यातील प्रतिबिंबाला बघूनच जडायचं. म्हणजे प्रतिबिंब हे प्रेमाची सुरुवात करणारं महत्वाचं साधन होतं असंही म्हणता येईल. मग त्या प्रतिबिंबाला सोबत घेत अनेक प्रेमकथा, प्रेमकविता वगैरे कथा लेखकांना आणि कविंना स्फुरायच्या आणि अजूनही स्फुरतात. प्रतिबिंबाला माध्यम करुन अनेक प्रणयचित्रेही मोठमोठ्या चित्रकारांनी रंगवलेली आहेत. अनेक जुन्या चित्रपटांतून नायक आणि नायिकाची प्रणयक्रिडाही जलाशयातील प्रतिबिंबाद्वारे प्रेक्षकांना सुखावून जायची.

बिंब आणि प्रतिबिंब ह्यांचे अद्वैत नाते सांगणाऱ्या मला आवडणाऱ्या ह्या चार ओळी मला इथे प्रस्तुत कराव्याशा वाटतात. कवीचे नांव मला माहीत नाही.

बिंब होते राधेचे, प्रतिबिंब ते कृष्णाचे
मनी बिंबले दोहोंचे तनापारचे नाते
अद्वैताची साक्ष याहूनी, असेल कुठली सांगा.
काठावरती दिसेल राधा पाण्यातील श्रीरंगा..!!

प्रतिबिंबाचे हे वैशिष्ट्य यापेक्षा अधिक ते कोणते, होय ना?

मधुसूदन (मदन) पुराणिक

Leave a Reply