महाराष्ट्रात खोके क्रांती घडवणारेच बनले महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष – सामनामधून टीका

मुंबई : ५ डिसेंबर – उद्धव ठाकरे गटाने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेल्या बंडखोरीचा संदर्भ देत शिंदेंनी ही बंडखोरी एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या मदतीने केली असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. इतकेच नाही तर सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे या बांधकाम व्यवसायिकाचा मोठा हात होता असा दावाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय बांधकाम व्यवसायिकाचा थेट उल्लेख करत निशाणा साधण्यात आला आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं टीका केली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जाणकार महाराष्ट्रात असताना नीती आयोगाप्रमाणे काम करण्याची अपेक्षा असलेल्या या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड कशी झाली असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. “नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.
सध्या मुख्यमंत्री शिंदेंबरोबर राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही आशर यांच्या नावावरुन शिंदेंवर यापूर्वी टीका केली होती अशी आठवणही शिवसेनेनं करुन दिली आहे. “महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाच्या आशीष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता. आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात,’ असा आरोप भाजपाच्या शेलारांचा होता. आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले. अर्थात विरोधी पक्ष हात चोळत बसणार नाही. तो एकजुटीने सरकारला सळो की पळो करून सोडेल. मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. तसेच, “शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे,” असा टोलाही लेखाच्या शेवटी लगावला आहे.

Leave a Reply