बंद खोलीतील ड्रममध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे

विशाखापट्टणम: ५ डिसेंबर – श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरत असताना देशातील अनेक भागांमधून अशाच प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एका बंद असलेल्या खोलीत एक ड्रम आढळून आला. त्यात एका महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. हा मृतदेह वर्षभराहून अधिक कालावधीपासून तिथे पडून असावा असा संशय पोलिसांना आहे.
घरात वास्तव्यास असलेल्यांनी अनेक महिने भाडं दिलेलं नव्हतं. त्यामुळे घरमालकानं दरवाजा तोडला. तेव्हा घरातील एका ड्रममध्ये त्याला महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये हा प्रकार उघडकीस आला. भाडेकरू काही महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला. त्याचं सामान घरातून बाहेर फेकून देण्यासाठी मालक घरी पोहोचला. तेव्हा त्याला ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले.
पत्नी गर्भवती असल्याचं सांगून भाडेकरूनं जून २०२१ मध्ये घर सोडलं. त्यानं घराचं भाडं थकवलं होतं. घर सोडल्यानंतरही भाडेकरू एकदा मागच्या दरवाज्यानं घरात शिरला होता. मात्र त्यानं आतापर्यंत घरमालकाला भाडं दिलेलं नाही. एक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर घरमालक भाडेकरुचं सामान घराबाहेर काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला ड्रममध्ये महिलेचे अवयव सापडले.
वर्षभरापूर्वी मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिली. हा मृतदेह भाडेकरूच्या पतीचा असू शकतो, अशी शक्यता विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त श्रीकांत यांनी बोलून दाखवली. या प्रकरणी घरमालकाच्या तक्रारीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply