पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपुरातील कार्यक्रमाचे स्थान बदलले

नागपूर : ५ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 डिसेंबर रोजीच्या नागपूर दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यक्रमाचं स्थान बदलण्यात आलं आहे. आता पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यानचा मुख्य सोहळा मिहानमधील एम्स रुग्णालयाच्या परिसरात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याच्या तसेच मेट्रोच्या रीच दोन आणि तीनच्या लोकार्पणासाठी नागपुरात येत आहेत. आता पंतप्रधानांच्या दौऱ्यात आणखी काही कार्यक्रम जोडण्यात आले आहेत. त्यामध्ये नागपुरातील एम्स रुग्णालयाला राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील मुख्य सोहळा समृद्धी महामार्गाऐवजी आता मिहानमधील एम्स रुग्णालय परिसरात होणार आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यात नागपूर तसेच अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रमही जोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात नागपूरकरांना एक ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मिळण्याची ही शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 11 डिसेंबरला पंतप्रधान समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी तिथे जातील त्या ठिकाणी ते टेस्ट ड्राईव्हही घेण्याची शक्यता आहे. तिथून परत आल्यानंतर एम्स रुग्णालयाच्या परिसरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यातूनच ते नागपूरसाठीच्या सर्व योजनांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. फक्त घोषणा करुन नव्हे तर पंतप्रधान एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची धडपड सुरु असल्याची माहिती आहे. इतक्या कमी वेळात रेल्वेची व्यवस्था करणे कठीण असल्याने अद्याप ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे वेळापत्रक जारी करण्यात आले नसून दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत औपचारिकरित्या समावेश करण्यात आला नसल्याची माहिती आहे.

Leave a Reply