जन्मठेपेशी शिक्षा सुनावल्या गुन्हेगाराचा भाजपमध्ये प्रवेश, कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत मिळाले जिल्हा उपाध्यक्षपद

ठाणे : ५ डिसेंबर – अंबरनाथमधील समीर गोसावी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या भालचंद्र भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भोईर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. असं असतानाही भाजपनं त्यांना प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच नागरिकांमधून प्रश्न उपस्थित करण्यात येत असून वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत.
अंबरनाथ मध्ये २००९ मध्ये व्यावसायिक वादातून समीर गोसावी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात भालचंद्र भोईर यांच्यासह त्यांच्या भावांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्यांना या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर भालचंद्र भोईर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला होता.
भालचंद्र भोईर हे मागील दीड ते दोन वर्षांपासून जामिनावर बाहेर आहेत. महिन्यातून एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते हजेरी देण्यासाठी येतात. मात्र आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत हा प्रवेश करण्यात आला. भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा भालचंद्र भोईर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला भाजपने थेट प्रवेश दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांचा पुतण्या समीर गोसावी याची २००९ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भालचंद्र भोईर यांच्यासह अन्य ११ आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणात जितेंद्र भोईर आणि शैलेश कुलकर्णी या दोन आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. तर या प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयाने प्रदीप दुबे आणि विनोद खुळे या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी भालचंद्र भोईर, प्रकाश भोईर, अरुण भोईर, मधुकर भोईर, गणेश भोईर, मंगेश भोईर, महेंद्र भोईर यांना २०१७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. भालचंद्र भोईर सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

Leave a Reply