खोटे वाद, खोटी कारस्थाने – मंदार परांजपे

राज्यपाल कोशारी यांच्या विधानावर पवारांनी जो गदारोळ उठवला त्याचे उत्तर खालील लेखात मिळू शकते..

“अगर कोई आपसे पूछता है कि आपका आदर्श कौन है, तो आपको उसे खोजने के लिए बाहर जाने की जरूरत नहीं है, वे आपको यहीं महाराष्ट्र में मिल जाएंगे. छत्रपति शिवाजी महाराज तो पुराने युग की बात है. अब नए युग में तो डॉ बाबासाहेब अंबेडकर से लेकर नितिन गडकरी तक आपको यहीं मिल जाएंगे.” – राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (१९ नोव्हेंबर २०२२).

“कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.” – राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (शिवनेरी किल्ला पायी चढून गेल्यावर, १६ ऑगस्ट २०२०).

दोन्ही विधाने तुमच्या समोर आहेत, पब्लिक डोमेनमध्ये याची डॉक्युमेंटेड प्रूफ उपलब्ध आहेत.

वय वर्षे ७९ असलेला, राज्यपाल पदावर विराजमान व्यक्ती ऑगस्टच्या मध्यात भर पावसात शिवनेरी किल्ला चढून जातो, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी.

अशा व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा विचार येईल का याचा सारासार विचार प्रत्येकाने आपल्या बुध्दीप्रमाणे करावा.

‘नव्या युगाला अनुसरून नवे आदर्श निवडावेत’ – असे विधान त्यांनी ज्या समारंभात केले त्यावेळी त्या ठिकाणी श्री शरद पवार हजर होते. ही घटना घडली १९ नोव्हेंबर रोजी. शरद पवार यांची या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया आली २४ नोव्हेंबर रोजी. शरद पवारांना प्रतिक्रिया द्यायला पाच दिवसांचा उशीर का लागला?

की १९ नोव्हेंबर रोजी ते वाक्य आपत्तीजनक नव्हते आणि अचानक २४ नोव्हेंबर रोजी ते आपत्तीजनक झाले?

की माध्यमांना हाताशी धरून वातावरण तापते की नाही हे तपासण्यात पाच दिवस गेले?

श्री जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांना ‘चार साडेचार फुटी’ म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?

श्री शरद पवार ‘शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणणे गरजेचे नाही’ असे म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?

श्री ज्योतिबा फुले त्यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘अक्षरशून्य शिवाजी’ असा करतात तेव्हा तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?

अशी अनेक उदाहरणे देता येतील. आव्हाड, पवार, ज्योतिबा यापैकी कुणालाही शिवाजी महाराजांचा अपमान करायचा नव्हता, त्या त्या संदर्भात त्यांनी ती विधाने केली होती हे थोडा सारासार विचार केला की समजून घेता येते.

सारासार विचार केल्यानंतर येणारी वैचारिक क्षमाशीलता केवळ राजकीय विरोधासाठी कुणी खुंटीवर गुंडाळून ठेऊ नये.

मोदी आणि शिवाजी महाराज यांची तुलना केली गेली तेव्हा गदारोळ उठवला गेला. (जानेवारी २०२०).

मात्र “शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे.” असे २० नोव्हेंबर २०१२ रोजी संजय राऊत सामना मध्ये लिहितात तेव्हा वाद निर्माण होत नाही. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी राऊत म्हणतात “(शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर) महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले.” त्यांच्या युगांत पुस्तकात त्यांनी लिहिले आहे – “अयोध्येतील राममंदिराची जागा , रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधी स्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे.”

या विधानांवर ना आक्षेप घेतले गेले, ना वाद निर्माण झाले.

शिवाजी महाराज आपली खाजगी राजकीय जहागीर आहे अशा अविर्भावात कुणीच राहू नये. हम करे सो कायदा अशी राजकीय गुंडगिरी कुणी करू नये.

माध्यमांना हाताशी धरून वादांचा भडका उडवून द्यायचा आणि त्यावर आपल्या राजकिय स्वार्थाची पोळी भाजायची हे धंदे आता सर्वांनीच बंद करावेत आणि राज्यासमोरच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे!

।।लेखनसीमा।।

  • मंदार परांजपे.

समाजमाध्यमावरुन साभार…

Leave a Reply