आता छत्रपती शिवाजीमहाराजांचा अपमान होत नाही काय…? – राजेश घाडी

१) ऐंशी नव्वदीच्या दशकातील गोष्ट…आम्ही लहान शाळकरी होतो. घराबाहेर रस्त्यावर खेळायला जाऊ तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेले कुठल्यातरी कागदी बंडलाचे तुकडे रस्त्यावर पडलेले दिसत. नंतर समजू लागलं ते कागद म्हणजे शिवाजी बिडी , संभाजी बिडी या बिडी पॅकेट च्या वेष्टनाचे तुकडे आहेत. हे तुकडे असे इतरत्र रस्त्यावर विखुरलेले असत. त्यावेळी राजकारण या गोष्टी कळत नव्हत्या पण आज कळतंय की तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जाणीव पूर्वक केलेला अपमान आहे. त्यावेळी देशात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते . मागची जवळपास सत्तर वर्षे छत्रपतींची नावे बिडीला देऊन आणि चित्रे पाकिटावर छापून महाराजांचा सातत्याने अपमान होत होता आणि राज्याच्या सत्तेवर बहुतांश मराठा नेते अगदी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा होते.

महाराजांचा हा घोर अपमान नव्हता का ?

२) एखाद्या संघटनेला , संस्थेला , पक्षाला महाराजांचे नाव द्यायचे मग त्या संघटनेने किंवा पक्षाने महाराजांची प्रजेबाबत असणारी नीती अन् त्यांचे सुचरित्र अंगिकारायला नको का ?

महाराजांचे नाव दिलेला पक्ष जर वसुली , खंडणी , हफ्ते बाजी , दलाली , वाझेगिरी, पुंड गिरी, भ्रष्टाचार यामध्ये लिप्त असेल तो महाराजांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अपमान आहे. कारण तो एकदाच होत नाही तर ठरवून वारंवार केला जातो. महाराजांचे नाव दिलेल्या पक्षावर तर आताच्या त्यांच्या दोन सहकारी पक्षांनी सुद्धा यापूर्वी ऑन रेकॉर्ड भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते मग अशावेळी महाराजांचे नाव पक्षाला असणे हा महाराजांचा अपमान नाही का ?

३) वड्याला, थाळीला महाराजांचे नाव अन् महामार्गाला , पुलाला , इस्पितळाला, स्पोर्ट सेंटरला, उद्यानाला बापाचे आणि आजोबांचे नाव यात महाराजांचा अपमान वाटत नाही का ?

४)ज्या टिपू चा मुंबई महाराष्ट्राशी काडीमात्र संबंध नाही त्याचे नाव मुंबईतील एका उद्यानाला आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला द्यायचे हा त्या टिपू विरुद्ध लढलेल्या मराठेशाही अन् त्या मराठेशाहीचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का ?

५) ज्या मुघलांविरोधात महाराजांनी अखेरपर्यंत लढा दिला , छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी आपले प्राण वेचले, त्या हाजीअलीतील मुघलांच्या नावाच्या गार्डन ला ३५ करोड रुपये देणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का ? ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची विटंबना नाही काय ?

६) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे वंशज असल्याचे पुरावे एका पक्षाच्या अतिसामान्य प्रवक्त्याने मागायचे हा महाराजांचा आणि त्यांच्या वंशजांचा अपमान नाही का ?

७)छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आहे परंतु राज्यातील एका मराठा नेत्याला त्यांच्या समर्थकांनी जाणता राजा ही उपाधी परस्पर देऊन टाकली आणि त्या नेत्याने सुद्धा महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असे परस्पर ठरवून टाकले. हा महाराजांचा अपमान नाही का?

खरंतर “जाणता राजा” नावाचे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर, इतिहासावर अन् चरित्रावर आहे अन् ते तुफान लोकप्रिय आहे.

८)पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ” भारत की खोज ” या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांना वाट चुकलेला देशभक्त असे संबोधण्यात आलेले आहे. हा महाराजांचा अपमान नाही का ? महाराजांची वाट कशी चुकली या चाचा नेहरूंच्या लिखाणाबद्दल तथाकथित काँग्रेसी मराठा नेते अन् तथाकथित पत्रकार अळीमिळी गुपचिळी का साधत असतील?

९)श्रीपाद छिंदम ही व्यक्ती सर्व पक्ष फिरून आलेली असून तिचे मूळ भाजप नसून काँग्रेस आहे. इतकेच काय तर महाराजांचा अपमान केल्यानंतर झालेल्या पुढच्या निवडणुकीसाठी या छिंदम ला बहुजन समाज पार्टी (बसपा) या तथाकथित दलीतांसाठी असलेल्या पार्टीने निवडणुकीचे तिकीट दिले होते. हा छत्रपतींचा अपमान नाही का ? त्यावेळेला कोणत्याही मराठी मीडिया चॅनेल , पक्षाने अन् कथित बुद्धिजीवींनी यावर साधे भाष्य ही केले नव्हते ही वस्तुस्थिती आहे.

१०)महाराजांच्या गड किल्ल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे , दर्गे , विशिष्ट प्रार्थनास्थळे हा महाराजांच्या इतिहासाचा अपमान नाही का ?
अफजल्याच्या कबरी भोवतालची अनधिकृत बांधकामे कोणत्या सरकारच्या काळात झाली. अफजलखान मेमोरियल ट्रस्ट ची स्थापना कोणत्या काळात झाली त्याला करोडोंचा वित्त पुरवठा कोणी केला याबद्दल आरटीआय टाकल्यास सुरस माहिती हातात येईल. अफजलखानाच्या नावाची ट्रस्ट स्थापन करणे आणि त्याला पैसा पुरवणे हा महाराजांचा अपमान नाही का ?

११)छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक हे सुप्रीम कोर्टात केस टाकल्याने स्थगित आहे परंतु ही केस ज्या मच्छिमार नेत्याने टाकली आहे तो शिवसेनेचा नेता दामोदर तांडेल हा आहे आणि हीच शिवसेना महाराजांच्या स्मारकावर कायम प्रश्न चिन्ह उभे करत सामान्य जनतेला भ्रमित करत असते.

१२) मध्यप्रदेशात जेव्हा महाराजांच्या पुतळ्याचा अपमान झाल्याचा विषय समोर आला तेव्हा राज्यात काँग्रेसच्या कमलनाथ चे सरकार अन् जिथे ही घटना घडली तिथे नगरपालिकेत भाजपाचा प्रतिनिधी होता. तेव्हा या घटनेचे खापर भाजपा नगरपालिका प्रतिनिधी वर टाकण्यात आले आणि कर्नाटकात महाराजांचा पुतळा सतीश जारकीहोळी या काँग्रेस आमदाराने रातोरात हलवला तेव्हा राज्यात भाजपाचे सरकार होते…त्याचा दोष भाजप राज्य सरकार वर टाकण्यात आला.
काही काळाच्या गॅप नंतर झालेल्या या दोन जवळपास सारख्याच विषयाच्या घटना…पण एकाचे खापर तिथल्या स्थानिक नगरपालिका प्रातिनिधि वर तर दुसऱ्याचे खापर राज्य सरकारवर…हे होते विरोधी पक्षांचे सोईचे राजकारण…
म्हणजे पडलो तरी तंगडी वर ही भूमिका…

एखाद्या इतर भाषिक व्यक्तीच्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढून विपर्यास करून तो महाराजांचा अपमान करतो अशी हाळी देण्यामागे आपल्या सत्तेत केलेल्या अनीती अन् बेमुर्वरखोर पणाला बेमालूमपणे लपवणे हाच एकमेव उद्देश असतो अन् ती न कळण्यापरिस देशाची जनता नक्कीच भोळी नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केव्हापासून संवेदनशील केला जातोय हे पाहिल्यास ही क्रोनोलॉजी लगेच लक्षात येते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे जागतिक नेते आहेत आणि देशाचे आदर्श आहेत त्यांचा इतिहास राज्यापुरता संकुचित करून आपल्या स्वार्थी राजकारणासाठी त्याचा वापर करणे म्हणजे महाराजांच्या इतिहासाचा, शौर्याचा अपमान करणे हेच होय.

महाराजांबाबत नाहक वाद उकरून काढणे आणि त्याचा वापर आपल्या स्वार्थी राजकारणासाठी करणे हा सध्याच्या राजकीय पक्षांचा एक कलमी अजेंडा आहे.

तो नसावा इतकीच माफक अपेक्षा.

राजेश घाडी….

समाजमाध्यमावरुन साभार…

Leave a Reply