नौदल २०४७ पर्यंत आत्मनिर्भर होईल – नौदलप्रमुख अँडमिरल आर. हरीकुमार

नवी दिल्ली : ४ डिसेंबर – भारतीय नौदलाने २०४७ पर्यंत आत्मनिर्भर होण्याची ग्वाही केंद्र सरकारला दिली असल्याचे प्रतिपादन नौदलप्रमुख अँडमिरल आर. हरीकुमार यांनी केले आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भारतीय महासागरातील चीनच्या लष्करी आणि शोध मोहिमा राबविणाऱ्या जहाजांवर देखील आमची करडी नजर असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील वर्षभराच्या काळामध्ये भारतीय नौदलाने अधिक वेगाने हालचाली करत मोहिमा राबविल्या असून सागरी सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आम्हाला काही स्पष्ट दिशा निर्देश दिले आहेत. यावर नौदलाने देखील आम्ही २०४७ पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भर होऊन दाखवू अशी ग्वाही सरकारला दिली असल्याचे हरीकुमार यांनी स्पष्ट केले. मागील वर्षभराच्या काळामध्ये नौदलामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचा नौदलामध्ये समावेश होणे हा एक महत्त्वाचा क्षण होता. सुरक्षा प्रणालीमध्ये आता भारतीय बनावटीच्या संसाधनांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेकडून हल्लेखोर ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून मूळ प्रस्ताव हा ३० ‘एमक्यू-९ बी’ ड्रोन खरेदीचा असून त्याची किंमत तब्बल ३ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. या ड्रोनच्या आगमनामुळे भारताची देखरेखप्रणाली अधिक भक्कम होईल. चीनलगतची सीमा आणि भारतीय सागरावर या ड्रोनची करडी नजर असेल अशी असेही नौदलप्रमुखांनी सांगितले. भारतीय नौदलाला भाडेतत्त्वावरील ड्रोनच्या वापराचा उत्तम अनुभव आहे. तिन्ही सेनादलांना प्रत्येकी दहा ड्रोन मिळतील असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply