‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट ‘अश्लील’ आणि प्रचारकीच – आणखी तीन ज्युरींचा नदव लॅपिड यांना पाठिंबा

मुंबई : ४ डिसेंबर – काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दाहक विषयामुळं तो प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत होता. चित्रपटावर तेव्हा टीकाही झाली आणि काहींनी त्याचं कौतुकही केलं. आता प्रदर्शनाच्या इतक्या महिन्यांनंतर ‘द कश्मीर फाइल्स’ पुन्हा चर्चेत आला. याचं कारण आहे ‘५३ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवातील’ प्रमुख ज्युरी असलेल्या नदव लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल केलेलं विधान.
इस्त्रायलमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माता नदव लॅपिड चित्रपटाविषयी म्हणाले होते की, ‘द कश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्व जण विचलित झालो आहोत. हा चित्रपट आम्हाला ‘अश्लील’ तसंच ‘प्रपोगंडा’ (विशिष्ट उद्देशानं प्रचार करण्याच्या हेतूनं बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणानं मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे.’ असं त्यानं म्हटलं होतं.
लॅपिड यांच्या या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. नदाव लॅपिड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, त्याच वेळी आपण या चित्रपटाच्या महोत्सवातील समावेशाबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आता लॅपिड यांच्या वक्तव्याशी आणि काश्मीर फाइल्सबद्दलच्या त्यांच्या मतांशी सहमत असल्याचं म्हणत आणखी तीन ज्युरींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. जिंको गोहोट, पास्कल चावांस आणि जेवियर एंगुलो बार्टुरन यांनी लॅपिड यांच्याशी सहमत असल्याचं म्हटलंय.
जिंको गोहोट यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यांनी भारताली काही महत्त्वाच्या मीडिया समूहांना टॅग करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. लॅपिड यांनी जे वक्तव्य केलं, त्याला आमचाही पाठिंबा होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काश्मीर फाइल्स पाहून आम्हालाही धक्का बसला होता. या स्पर्धेसाठी हा चित्रपट योग्य नव्हता, लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यांशी आम्ही सहमत आहोत, असं जिंको गोहोट यांनी त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

Leave a Reply