तरीही पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे भाव का कमी झाले नाहीत? – राहुल गांधी

भोपाळ : ४ डिसेंबर – राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये येणार आहे. या दरम्यान राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तसेच संपूर्ण भारताला एकत्र आणणार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी होत नाहीत? यासाठी राहुल गांधींनी ट्विटरवर काही आकडेही शेअर केले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, “कच्चे तेल – “25% स्वस्त, LPG – 40% स्वस्त… हे 6 महिन्यांचे आंतरराष्ट्रीय किमतीचे आकडे आहेत. तरीही पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे भाव का कमी झाले नाहीत? पंतप्रधान, तुमच्या लूट व्यवस्थेविरुद्ध लोकशाहीचा आवाज आहे – भारत जोडो यात्रा, उत्तर द्या!
याआधीही राहुल गांधींनी तेलाच्या किमतीवरून सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, “भारतातील जनता महागाईने त्रस्त आहे, पंतप्रधान त्यांच्या वसुलीत मग्न आहेत.” यादरम्यानही राहुल यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले होते. याशिवाय राहुल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही सतत बोलत आहेत. अलीकडेच राहुल म्हणाले होते की, “भाजप आणि आरएसएसचे लोकं भगवान रामासारखे जीवन जगत नाहीत. भाजप आणि आरएसएसचे लोक महिलांच्या सन्मानासाठी लढत नाहीत.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये माध्यम प्रतिनिधींनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेशी संबंधित एक प्रश्न विचारला. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी या प्रतिनिधीला मध्येच तोडत, वेगळ्याच अंदाजात एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “भाई साहब, राहुल गांधी को मैंने सालों पहले छोड दिया है. राहुल गांधी दिमाग में है, मेरे दिमाग में नहीं.”

Leave a Reply