पक्ष बांधणी हेच माझे सध्याचे उद्दिष्ट – सुषमा अंधारे

नागपूर : २ डिसेंबर – राज्यात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुषमा अंधारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे सूतोवाच केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यात नुकत्याच शिवसेनेत पदार्पण झालेल्या सुषमा अंधारेंचंही नाव येतंय. मात्र या शक्यतांवर सुषमा अंधारेंनी स्पष्टच वक्तव्य केलं.
मी मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी नाही. राज्यात इतरही अनुभवी महिला नेत्या आहेत. त्या मुख्यमंत्री झालेल्या मला आवडेल. मी पक्षात सध्या शेंडेफळ असून पक्ष बांधणी हेच सध्याचं उद्दिष्ट असल्याचं अंधारे म्हणाल्या.
नागपूरात सुषमा अंधारे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ जर एकिकडे यूपीत एखादी महिला पाच वेळा मुख्यमंत्री होत असेल तर महाराष्ट्रात अशी मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही. ती संधी कुणाला द्यायची, हे पक्षप्रमुख ठरवलीत.
मी या परिवारातील शेंडेफळ आहे. मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी नाही. संघटनात्मक पातळीवर छान काम करायचं आहे. पक्षाची बांधणी करायची आहे. जहाँ हू बहोत चैन से हूं… जगू द्या..अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदी विराजमान होणाऱ्या कोणत्या नेत्या आहेत, यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी दोन नावं घेतली. त्या म्हणाल्या, यात सुप्रिया ताईंचं नाव आहे. पंकजा ताई मुंडेही चांगलं वाटतं. शिवसेनेतही अनेक महिला वाटतात, ज्या या पदावर बसू शकतात. एवढ्या सिनियर लोकांमध्ये मी या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक शिपाई म्हणून काम करायला आवडेल…
मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. शिवशक्ती, भीमशक्ती, लहूशक्ती एकत्र आल्यास आपण महाराष्ट्रात एक ताकदवान सरकार आणू. सक्षम मुख्यमंत्री या पदावर बसवू. मग तो महिला असेल किंवा पुरूष… उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात कोण असेल तो महिला मुख्यमंत्र्याचा चेहरा, यावरून चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply