तरुणाने फक्त १० हजार रुपयात बनवली ६ सीटर ई-बाईक

मुंबई : २ डिसेंबर – इंधनाचे दर वाढल्याने नवनवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक बाईक आणि कार्सची निर्मिती करत आहेत. पण मोठमोठ्या कंपन्यांच्या वाहनाना तगडी टक्कर देईल, अशा भन्नाट बाईक्स भारतीय तरुणही बनवत आहेत. सध्या एका अशाच ई-बाईकची चर्चा आहे. ही बाईक सहा सीटर असून, तिला बनवण्यासाठी केवळ 10,000 रुपयांचा खर्च आलाय. ही सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटरपर्यंत जाते. या बाईकने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी ट्विटरवर या बाईकचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कंपनीचे चीफ डिझायनर प्रताप बोस यांना इंजिनीअरिंगबाबत एक प्रश्नही विचारला आहे.
आनंद महिंद्रा यांनी खेड्यात बनवलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये चालकासह 6 लोक बसू शकतात. तसंच ती एका चार्जमध्ये 150 किमी जाते आणि 8 ते 10 रुपये खर्च करून पूर्ण चार्ज होते, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय.
या इलेक्ट्रिक बाईकची खास गोष्ट म्हणजे यात जास्त फीचर्स नाहीत, पण ग्रामीण भागात फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर ही बाईक शेतातही आरामात चालते म्हणजेच ती ऑफ-रोडदेखील उत्तम चालते. ही बाईक बनवण्यासाठी खर्च 10,000 ते 12 हजार रुपये असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ही बाईक पाहून महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचं दिसतंय.
आनंद महिंद्रा ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. ते आपल्या देशातील अशा अनोख्या आणि भन्नाट टॅलेंटचे व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करत असतात. हा व्हिडिओ त्यांनी शेअर करून या बाईकबद्दल आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीचे चीफ डिझायनर प्रताप बोस ज्यांनी महिंद्रा XUV700 आणि Mahindra ScorpioN सारख्या कारची डिझाईन्स केली आहेत. त्यांना विचारलं की, ‘चेसिससाठी एक सिलेंड्रिकल सेक्शन बनवून आणि बाईकच्या डिझाइनमध्ये किरकोळ बदल करून, ही बाईक जगभरात वापरली जाऊ शकते. या बाईकचा वापर युरोपमधील व्यस्त पर्यटन केंद्रांवर ‘टूर बस’ म्हणूनही करता येईल.’
‘खेडेगाव आणि ग्रामीण भागात ट्रान्सपोर्टसाठी होणाऱ्या नवनवीन शोधांनी मी नेहमीच प्रभावित होतो. तिथं खरंच, गरज ही शोधाची जननी आहे,’ असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय. दरम्यान, आनंद महिंद्रा या बाईकमुळे चांगलेच प्रभावित झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात महिंद्राने अशी बाईक बनवली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

Leave a Reply