माफी मागून विषय सुटणार नाही, राज्यपालांनी राजीनामाच द्यायला हवा – उदयनराजे भोसले

मुंबई : १ डिसेंबर – उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी यावरून भाजपला देखील इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर स्वस्थ बसणार नाही. माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी पक्षीय कारवाईला देखील घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये. 3 तारखेनंतर राज्यपालांच्या विरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढवणार असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
उदयनराजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली आहे. ज्याप्रमाणे शिवराय आग्र्याहून सुटले तसेच शिंदे हे बाहेर पडल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. यावर देखील उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांना कोणी पकडून नेले नव्हते, तर त्यांचा विश्वाघात झाला होता. कोणी यांना विरोध करत नाही त्यामुळे हे असे वक्तव्य करतात असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply