गच्छंती…- मधुसूदन (मदन) पुराणिक

राजकारण हे वारसाहक्काने आलेल्या, स्वयंघोषित अथवा लांगुलचालनकर्त्यांनी जहांगीरी घोषीत केलेल्या अभ्यासहीन, दर्जाहीन आणि निर्बुद्ध चाळीशी पार केलेल्या तरुण(?) नेत्यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तासंबधी गैर वक्तव्य करणे ह्याचा केवळ निषेधच नव्हे तर त्यांची राजकारणातील पाळेमुळे खणून, उपटून अथवा उखडून टाकण्याची वेळ आता आलेली आहे.

आपले वय काय, आपला अभ्यास काय, आपले कर्तृत्व काय हा विचारही न शिवलेले हे नेते आपल्या वाचाळ विखारी वक्तृत्वाने देशातील सौहार्दाचे वातावरण नासवत आहेत हे या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशासाठी नक्कीच योग्य नाही.

वैचारिक मतभेद हे या थराला जर जात असेल किंवा कोणी मुद्दाम हे काम करीत असेल तर ह्या त्यांच्या उद्दामपणाला अतिशीघ्र वेसण घालणे अत्यावश्यक झाले आहे.

केवळ आमच्याच कुटुंबातील सदस्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, प्राणांची बाजी लावली आणि आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवतो आहोत ते केवळ त्यांच्याचमुळे हा अविचारी अहंकार गाजवत राष्ट्राला पारतंत्र्यातून मूक्त करण्यासाठी लढलेल्या प्रत्येक सामान्यातील असामान्य, कर्तृत्ववान देशभक्तांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा उपमर्द आपण करतो आहोत हे अशा नालायक नेत्यांना कसे आणि कधी कळणार?

वारसाहक्काने घर, धन आणि संपत्ती मिळू शकते परंतु मान आणि सन्मान हा स्वकर्तृत्वानेच मिळवावा लागतो. घर, धन आणि संपत्ती टिकवण्यासाठी जेवढे कष्ट घ्यावे लागतात त्यापेक्षा जास्त कष्ट हे घराण्याचा मान , सन्मान टिकवण्यासाठी घ्यावे लागतात. त्यासाठी आपल्या अंगीच्या सद्गुणाने सर्वांना आपलेसे करीत, आपल्या पूर्वपिढीच्या कर्तृत्वाची आठवण ठेवत, त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करीत स्वतःला सिध्द करावे लागते.

आपल्याजवळ आपले स्वत:चे कमावलेले काहीच नाही, कर्तृत्वही नाही, बुद्धी तर आहे की नाही ही इतरांना शंका यावी अशी, तरीसुद्धा सारं काही केवळ आपल्यालाच कळते हा अहंपणा सांभाळणाऱ्या, वाटेल ते उर्मटपणे बोलणाऱ्या अशा विघ्नसंतोषी नेत्यांची गच्छंती आवश्यक झालेली आहे आणि सुबुद्ध राष्ट्रशक्ती त्यासाठी नक्कीच आपले योगदान देईल ही अपेक्षा.

मधुसूदन (मदन) पुराणिक

Leave a Reply