संपादकीय संवाद – निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज

नागपूर जिल्ह्यातील एका गावात शाळेच्या आसपास एक वाघीण आपल्या पिल्लांसह फिरत आहे, यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनाची काळजी वाटल्याने शिक्षकांनी ही शाळा दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी केली असल्याची बातमी आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील एका गावात माकडांनी हैदोस घातल्यामुळे सुमारे महिनाभरापासून त्या गावात अघोषित संचारबंदी लागली आहे. परिणामी तीथलीही शाळा बंद आहे.
गेल्या काही वर्षांत मानव आणि वन्यप्राणी यांच्यात कायम संघर्ष वाढतांना दिसतो आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राणी नागरी वस्तीत येऊन कधी जनावरांवर तर कधी माणसांवर हल्ले करतांना दिसतात. तर काही प्राणी शेती आणि इतर मालमत्तेचे नुकसानही करतात. त्यामुळे जनसामान्य त्रस्त आहेत. त्यातच प्राण्यांना मारू नये यासाठी कायदेही झाले आहेत. परिणामी त्रास देणारे श्वापद मारण्याचा प्रयत्न केला तर वन्यप्राणी संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते धावून जातात आणि मग संबंधित व्यक्तीला फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागते. या सर्व प्रकारामुळे जनसामान्यांत प्रचंड अस्वस्थता असलेली दिसून येते.
निसर्गाची रचना झाली त्यावेळी वन्यप्राण्यांसाठी जंगले तर मानवासाठी नागरी वस्ती अशी व्यवस्था होती. जनसामान्य नागरी वस्तीत आनंदात आयुष्य जगात होते, तर वन्यप्राणी आपल्या जंगलात खुशीत होते. जर मनुष्यप्राणी जंगलात वन्यप्राण्यांवर हल्ला करायला गेला तरच प्रत्युत्तरात वन्यप्राणी त्याच्यावर हल्ला करून त्याची शिकार करायचे, अन्यथा जंगलातील इतर तृणभक्षी प्राणी हेच हिंस्त्र वन्यप्राण्यांचे अन्न होते. मात्र गेल्या काही शतकांमध्ये मनुष्यप्राण्याची संख्या प्रचंड वाढते आहे. मग विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे, टेकड्याही भुईसपाट केल्या आहेत, आणि तळी सरोवरेही बुजवण्याचे प्रयत्न झाले आहेत. भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ ८५०० माजी मालगुजारी तलाव होते, हे बहुतेक सर्व तलाव बुजवले गेले आणि त्यावर वस्त्या उभ्या झाल्या असल्याचे बोलले जाते. यामुळेच वन्यप्राण्यांच्या अधिवासावर मानवाने आक्रमण केले आहे, हे स्पष्ट होते. अश्या परिस्थितीत ते वन्यप्राणी नागरी वस्तीत आले आणि त्यांनी उपद्रव दिला तर दोष कुणाला द्यायचा?
जंगले कमी झाली, आणि त्यामुळे या जंगलातील तृणभक्षी प्राणीही कमी झाले. परिणामी हिंस्त्र श्वापदांची उपासमार होऊ लागली. त्यामुळेच मग हे हिंस्त्र प्राणी नागरी वस्त्यांमध्ये येऊन गायी-म्हशी शेळ्या-बकऱ्या अश्या माणसाळलेल्या प्राण्याची शिकार करू लागले. त्याचवेळी जंगलानजीक शेती किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या व्यक्तींनाही ते आपले भक्ष्य म्हणून वापरू लागले. जंगलात जागा नाही म्हणून हत्ती रानडुकरे माकड हे शेतात येऊन गोधळ घालू लागले. परिणामी सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान तर होऊ लागलेच पण अनेकांचे जीवही गेले.
निसर्गाचा समतोल राखायचा असेल, तर मनुष्य प्राण्यांसोबत पशुधनही हवेच. ते फक्त पाळीव प्राणीच असावीत असे नाही तर वन्यप्राणीही हवे. तरच निसर्गाचा समतोल कायम राहील. अन्यथा निसर्ग नको ते चमत्कार घडवून मानवी जीवन धोक्यात आणू शकेल.
हे मुद्दे लक्षात घेऊन समाजधुरीणांनी वेळीच जागे व्हायला हवे. निसर्गाचा समतोल राखला जायलाच हावा. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघडला तर एक दिवस हा निसर्गाचं तुम्हाला जगबुडीकडे नेईल हा धोका लक्षात घ्यायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply