शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्याचा संकल्प करावा – नितीन गडकरी

नागपूर : २८ नोव्हेंबर – शेतकऱ्यांनी आगामी पाच वर्षात देशी गायींच्या दुधाचे उत्पादन प्रतिगाय २० लिटरपर्यंत नेण्याचा संकल्प करावा, त्यासाठी मदर डेअरी, महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठ, डेअरी बोर्ड यांच्या योजना आणि उपक्रमांमध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दाभा येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘विदर्भाचा दुग्ध विकास’ विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी माफसूचे डॉ. आशिष पातूरकर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, एनडीडीबीचे महाव्यवस्थापक व्ही. श्रीधर, बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक घनश्याम गुप्त, एनडीडीबीचे जितेंद्र सोलंखी, विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास चे प्रकल्प संचालक डॉ. रवींद्र ठाकरे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, मदर डेअरीमुळे बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळू लागला.
मदर डेअरी त्याच दिवशी पेमेंट करते. त्यामुळे तत्काळ खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. एम्ब्रीयो ट्रान्सफर पद्धतीचा उपयोग करून जादा उत्पादन देणारी गोरी तयार होईल आणि हीच गोरी गरीबी दूर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान मदर डेअरीच्या समृद्धी फिड्स सापलीमेन्ट आणि कृत्रिम रेतन सेवा डोरस्टेपचा शुभारंभ केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाला.
यावेळी व्ही. श्रीधर, एनडीडीबीचे व्यवस्थापक डॉ. सचिन शंखपाल, डॉ. रवींद्र ठाकरे यांची भाषणे झाली. दरम्यान, डॉ. वसीम हुन्नरे यांनी दुधाळू जनावरांसाठी पारंपरिक उपचार पद्धतीवर मार्गदर्शन केले. सुधीर दिवे यांनी संचालन केले.

Leave a Reply