प्रवास…..- मधुसूदन पुराणिक

आज ह्या स्थळी, इथे थांबल्यावर, मागे वळून बघीतल्यावर दूर जाणारा सूर्य, क्षितीज, ती झाडांमागे अवतरत असलेली सायंकाळ बघताना आपण आपल्या सुरवात केलेल्या स्थानापासून इथपर्यंत केलेला प्रवास डोळ्यांसमोर यायला लागला आणि ही सुरुवातच कशी झाली हे बघायला आंत डोकावलो.

खरंच किती झाला हा प्रवास, किती अंतर, कितीजण ह्या प्रवासात भेटलेत, कितींनी साथ दिली, कितींनी साथ सोडली, कितींना सहप्रवास सोडावा लागला, किती ह्या प्रवासात जोडल्या गेलेत तर किती तुटलेपण, कितींचा लळा लावला तर कितींनी जवळच नाही येऊ दिलं, कितींनी जवळ घेतलं तर कितींंचं जवळ घेणं क्षणभंगूर ठरलं वगैरे वगैरे सारख्या प्रश्नार्थक आठवांनी मनांत काहूर उठवलं, हृदयांत कालवाकालव केली, डोळ्यांत खारं पाणी आणलं तर काहींनी नुसतं मौन धारण करायला लावलं.

हा आतापर्यंत झालेला प्रवास सुरवातीला कसा होता हे आठवताना आठवलं ते थोडी समज आल्यानंतरचं निरागस बालपण, तेव्हाची नातीगोती, सखे-शेजारी, शाळा, मित्र, सवंगडी, लुटुपुटुची भांडणं, राग, लोभ, आपुलकी…आयुष्यातला अनुभवलेला निखळ आनंद, पुढे कधीही हातात न येऊ शकणारा.

पुढे वय वाढत गेलं आणि ते वाढत जात असताना आयुष्याला अनेक पैलू पडत गेले. हे पैलू पडत असताना काही तुकडेही पडले, काही चमकणारे क्षणही अनुभवाला आलेत तर काही अनुभवांनी आयुष्य काळवंडूनही गेलं. असं म्हणतात की अनुभव हाच तुमचा खरा गुरु असतो. शाळेत असताना काही शिक्षक हे कडक होते हे अनुभवलं होतं परंतु आयुष्याला वळण देणारा हा अनुभव गुरु हा इतका काळीज नसणारा असेल ह्याची यत्किंचितही कल्पना केलेली नव्हती. अर्थात ह्या गुरुंनी लढायला शिकवलं, झुंजायला शिकवलं आणि हरलो ना तरीही पुन्हा पुन्हा त्या पराजयातून काहीतरी वेगळं करण्याची संधी निर्माण करायलाही शिकवलं.

असो, आयुष्य, त्यातील प्रसंग, कडू-गोड अनुभव घेत घेत पुढे पाऊल पडत गेलं. कधी यश तर कधी अपयश, कधी आनंद तर कधी क्लेश, कधी यातनामय जखमा तर कधी देह-मनावरचा मुलायम, आल्हादक स्पर्शानुवही मिळत गेला. ऊन्हाची निखाऱ्यागत लाहीलाही करणारी तीव्रता, पावसाची देहाला आणि मनाला चिंबवून टाकणारी संततधार आणि हिवाळ्यातील कोवळ्या ऊन्हातही मन उल्हासित करणारा गारवा समाधानाचे काही क्षणही देऊन गेला.

सारंच वाईट किंवा सारंच सुखमय नसलं तरीही समाधानाच्या शिदोरीने आयुष्यातील जगण्याची भूक शमवली, पायातलं बळ धावण्याइतकं नसलं तरीही चालण्याइतकं तर नक्कीच दिलं. त्याच पायांनी आजपर्यंत इथवर चालत आलो, आज इथं विसावलो.

हे मागे पाहून झाल्यावर, ‘पुन्हा पुढचा प्रवास किती?’ असं मनात आलं आणि पुढच्या वाटेकडे बघीतलं तर त्या वाटेला शेवट नव्हता. वाटलं की असं किती चालत राहणार? पावलं किती साथ देणार? कुठंतरी थांबावं, विसावावं लागणार, जसं आज आता थांबलो, विसावलो ना तसंच. अर्थात प्रत्येक प्रवास आणि प्रत्येकाचा प्रवास कुठंतरी थांबणारच…प्रत्येकाची वेळ, गंतव्य स्थान आलं की. तबतक…राही तुझको चलना होगा, तुझको चलना होगा.

मधुसूदन (मदन) पुराणिक

Leave a Reply