युवकांनी G20 शिखर परिषदेत सहभाग घ्यावा – पंतप्रधानांच्या मन की बात

नवी दिल्ली : २७ नोव्हेंबर – पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांचं लक्ष G20 वर होतं. भारत 2023 च्या G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. पीएम मोदी म्हणाले, ‘मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. हा कार्यक्रम 95 वा भाग आहे आणि आम्ही हळूहळू शतकाकडं वाटचाल करत आहोत. काही दिवसांपूर्वी मला G-20 लोगो आणि भारताच्या अध्यक्षपदाची वेबसाइट लॉन्च करण्याचं सौभाग्य मिळालं.’
पंतप्रधान पुढं म्हणाले, ‘G-20 मध्ये जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या आहे. जागतिक व्यापाराचा तीन चतुर्थांश हिस्सा आहे आणि जागतिक GDP च्या 85 टक्के आहे. तुम्ही कल्पना करू शकता. भारत आतापासून तीन दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबरपासून एवढ्या मोठ्या गटाचं आणि इतक्या शक्तिशाली गटाचं अध्यक्षपद भूषवणार आहे. G20 चं अध्यक्षपद ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपण ग्लोबल गुड, वर्ल्ड वेल्फेअरवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.’
शांतता असो वा एकता, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा शाश्वत विकास असो भारताकडं या संबंधित आव्हानांवर उपाय आहेत. G20 मध्ये येणारे लोक आता प्रतिनिधी म्हणून येऊ शकतात. परंतु, ते भविष्यातील पर्यटक देखील आहेत.
येत्या काही दिवसांत G20 शी संबंधित अनेक कार्यक्रम देशाच्या विविध भागात आयोजित केले जाणार आहेत. या दरम्यान, जगातील विविध भागांतील लोकांना तुमच्या राज्यांना भेट देण्याची संधी मिळेल. मला खात्री आहे की, तुम्ही तुमच्या स्थानिक संस्कृतीचं वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण रंग जगासमोर आणाल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशानं अवकाश क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारतानं आपलं पहिलं रॉकेट अंतराळात पाठवलं. याची रचना आणि तयारी भारताच्या खासगी क्षेत्रानं केली होती. ‘विक्रम’ असं या रॉकेटचं नाव आहे.
श्रीहरिकोटा येथून स्वदेशी स्पेस स्टार्ट-अपच्या या पहिल्या रॉकेटनं ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावली. मित्रांनो, विक्रम-एस रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. खरं तर, विक्रम-एसच्या प्रक्षेपण मोहिमेला दिलेलं प्रारंभिक नाव अगदी तंतोतंत बसतं. हे भारतातील खासगी अवकाश क्षेत्रासाठी एका नवीन युगाची सुरुवात आहे.
तुम्ही कल्पना करू शकता की, जी मुलं कागदी विमानं हातानं उडवत असत, त्यांना आता भारतातच विमान बनवण्याची संधी मिळत आहे. एकेकाळी चंद्र-तारे पाहून चित्र रेखाटणाऱ्या मुलांना आता भारतातच रॉकेट बनवण्याची संधी मिळत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता.
हा उपग्रह अतिशय चांगल्या रिझोल्यूशनची छायाचित्रं पाठवेल, त्यामुळं भूतानला त्याच्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनात मदत होईल. या उपग्रहाचं प्रक्षेपण हे भारत-भूतानच्या मजबूत संबंधांचं प्रतिबिंब आहे. अंतराळ क्षेत्रातील यश भारत आपल्या शेजारी देशांसोबत शेअर करत आहे.
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ड्रोनद्वारे सफरचंदांची वाहतूक कशी होते हे आपण पाहिलं. मित्रांनो, आज आपले देशवासी त्यांच्या नाविन्यानं त्या गोष्टी शक्य करत आहेत, ज्याची पूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही? अलिकडच्या वर्षांत आपल्या देशानं उपलब्धींचा मोठा पल्ला गाठला आहे.
यूपीची राजधानी लखनौपासून 70-80 किलोमीटर अंतरावर हरदोई, बांसा हे गाव आहे. मला या गावातील जतीन ललित सिंहजी यांच्याबद्दल माहिती मिळाली आहे, जे शिक्षणाचा प्रकाश जागृत करण्यात मग्न आहेत. जर कोणी ज्ञानदान करत असेल तर तो समाजहिताचं सर्वात मोठं कार्य करत आहे.
घराजवळच्या कोणत्यातरी मंदिरात भजन-कीर्तन चालू आहे, असा विचार तुम्ही करत असाल. पण, हा आवाज भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या दक्षिण अमेरिकन देश गयानामधूनही तुमच्यापर्यंत येत आहे.
आपल्या संगीताच्या शैलींनी आपली संस्कृती तर समृद्ध केलीच, पण जगाच्या संगीतावरही आपली छाप सोडली आहे. भारतीय संगीताची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. नदीचा खळखळाट असो, पावसाचे थेंब असो, पक्ष्यांचा किलबिलाट असो किंवा वाऱ्याचा गुंजणारा आवाज असो, आपल्या संस्कृतीत संगीत सर्वत्र आहे.

Leave a Reply