संपादकीय संवाद- भारतीय इतिहासाचे योग्य पद्धतीने पुनर्लेखन व्हायलाच हवे

भारतीय इतिहासाचे योग्य पद्धतीने पुनर्लेखन व्हायला हवे अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास सरकार अश्या उपक्रमांना पाठिंबाच देईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
अमित शाह यांचे हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागेल. आपल्या देशात प्राचीन काळात बखरीच्या माध्यमातून इतिहास जतन केला जात होता. आठव्या शतकानंतर भारतावर मुस्लिमांनी आक्रमण करून भारतावर राज्य सुरु केले, साधारणतः १४व्या ते १५व्या शतकाच्या दरम्यान आधी पोर्तुगीज आणि मग इंग्रज भारतात आले. मुस्लिम राज्यकर्ते आणि नंतर इंग्रज राज्यकर्ते यांनी आपल्या सोयीने इतिहासाची तोडफोड केली, आणि चुकीचा तसेच दिशाभूल करणारा इतिहास तयार केला. आजही तोच इतिहास आम्हाला उपलब्ध करून दिला जातो आहे.
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्याने खरा इतिहास लोकांसमोर आणला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तत्कालीन राज्यकर्ते हे देखील इंग्रजांचे अंकित असल्यासारखेच वागत होते. त्याचवेळी डाव्या विचारसरणीचे विद्वानही देशात सक्रिय झाले होते. त्यामुळे त्यांनी आधीच इंग्रजांनी विकृत केलेला मूळ इतिहास अधिकच बिघडवला, परिणामी हिंदू संस्कृतीतील राजे राजवाड्यांपेक्षा मुस्लिम आणि इंग्रज शासकांचेच अतिरेकी कौतुक आपल्या इतिहासात केले गेलेले दिसून येते आहे. आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत, तरीही असा विकृत इतिहासाचं आम्हाला वाचावा लागतो आहे.
नाही म्हणायला अनेक इतिहास संशोधकांनी जुन्या बखरीचा अभ्यास करून खऱ्या इतिहासाला देशातील जनसामान्यांसमोर आणण्याचा प्रयत्न निश्चितच केला मात्र अश्या इंग्रजाळलेल्या कथित पुरोगाम्यांनी जातिधर्मांच्या जोखडात अडकवत अश्या इतिहास संशोधकांना बदनाम करण्याचे काम केले. राजकीय स्तरावर हेवेदावे सांभाळण्यासाठी अश्या इतिहासातील नोंदींचा उपयोग केला गेला. त्यामुळे आजही आम्हाला विकृत इतिहासाचं वाचावा लागतो आहे.
या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचे हे विधान निश्चितच दिलासादायक आहे. केंद्र शासनाने देशातील सर्व प्रांतातील इतिहासाचे संशोधन करून खरा इतिहास लोकांसमोर यावा यासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करायला काही हरकत नाही, अश्या स्वतंत्र खात्यामार्फत देशातील खरा इतिहास लोकांसमोर एका चांगल्या दस्तावेजाच्या स्वरूपात यावा आणि ते दस्तावेज चिरकाल टिकवले कसे जातील ? याची व्यवस्था व्हावी अशी सर्वसामान्य भारतीयांची अपेक्षा आहे. अर्थात कथित पुरोगामी मंडळी त्याला विरोध करण्याचाही प्रयत्न करतील मात्र मोदी सरकारने हे प्रयत्न हणून पाडावे आणि ऐतिहासिक वास्तव लोकांसमोर आणावे ती आजची खरीखुरी गरज आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply