शिवसेना, भाजप युतीमुळे आम्ही मागे राहिलो – चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी : २५ नोव्हेंबर – चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आमची जेव्हा युती होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांचं ऐकलं. हट्ट करणे हा बालिशपणा आहे. आता असं वाटत की तेव्हा आम्ही एकटे चाललो असतो तर खूप पुढे गेले असतो. मात्र शिवसेना, भाजप युतीमुळे आम्ही मागे राहिलो. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती केली तेव्हाच त्यांनी आपल्या सर्व आमदारांचा राजीनामा घेऊन पुन्हा निवडणूक लढवायला हवी होती, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलणार त्यांची रोजची स्क्रिप्ट तयार असते. रणशिंग फुंकायचे दिवस संपले आहेत, संजय राऊत असेच बोलत राहिले तर उरलेले आमदार पण जातील. उरलेल्या आमदरांचे काम तरी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे का?, फक्त आलेला कागद स्विय सहाय्यकाकडे देणं एवढंच काम ते करतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
गेले 18 महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय बघितलं नाही, फक्त फेसबुक लाईव्ह घेत बसले. आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची गणाणा होईल. मात्र आता 18 तास काम केल्याशिवाय शिंदे, फडणवीस सरकार झोपत नाही, असेही यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तायरी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा रत्नागिरी दौरा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेची जागा कोण लढवणार शिंदे गट की भाजप यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गची जागा भाजप आणि शिंदे गट युती लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात 45 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा भाजप जिंकेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply