इतिहास योग्य आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार? – अमित शाह

नवी दिल्ली : २५ नोव्हेंबर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासकारांना भारतीय संदर्भातून इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले आहे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल, असे आश्वासन शाह यांनी दिले आहे. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे? असा सवाल अमित शाह यांनी दिल्लीमध्ये आयोजित आसाम सरकारच्या कार्यक्रमात विचारला आहे.
मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. आपला इतिहास मोडतोड करून मांडण्यात आल्याचे मी अनेकदा ऐकले आहे. हे कदाचित खरं असू शकतं. त्यामुळे आपल्याला आता यात दुरुस्ती केली पाहिजे”, असं शाह यांनी म्हटले आहे. सतराव्या शतकातील अहोम साम्राज्याचे सेनापती लचित बोरफुकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
भारतावर १५० हून अधिक वर्ष राज्य करणाऱ्या ३० राजवंशांवर आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या ३०० नामवंत व्यक्तिमत्वांबाबत संशोधन करा”, असे आवाहन शाह यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना केले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन झाल्यानंतर खोट्या बाबींचा प्रचार होणार नाही, असे शाह यावेळी म्हणाले. भारतात मुघलांचा विस्तार रोखण्यासाठी सेनापती लचित यांच्या योगदानाचा शाह यांनी गौरव केला. यावेळी सरियाघाट युद्धात लचित यांनी मुघलांच्या केलेल्या पराभवाच्या आठवणी शाह यांनी जागवल्या.
या कार्यक्रमात अमित शाह यांनी लचित यांच्यावर आधारित माहितीपट लॉन्च केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य आणि उर्वरित भारतातील दरी कमी केली, याकडेही शाह यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाल्याचे शाह यावेळी म्हणाले.

Leave a Reply