संपादकीय संवाद – असे व्यसनी शिक्षक समाजाला कलंकच

अमरावती जिल्ह्याच्या आदिवासी भागातील एका ग्रामीण शाळेत मुख्याध्यापकाच मद्यधुंद अवस्थेत शाळेच्या वर्गखोलीत झोपलेला आढळला, त्याच ठिकाणी त्याने लघुशंकाही केलेली दिसून आली, या प्रकारामुळे केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक क्षेत्र हादरलेले दिसते आहे.
शिक्षक म्हणजे गुरु आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिलेले आहे. गुरूला ब्राह्म, विष्णू, आणि महेशाच्या बरोबर ठेऊन गुरुचे पूजन करावे असे आपली संस्कृती सांगते. गुरु हा फाटक विद्यार्थ्यांचाच नव्हे तर समाजाचाही आदर्श मानला जातो. मद्यपान धूम्रपान असे दुर्गुण समाजासाठी हानिकारक आहेत, त्यामुळे या दुर्गुणांपासून दूर राहावे असे शालेय स्तरावरच शिकवले जाते, आणि असे शिकवणारे शिक्षकच जर मद्यधुंद अवस्थेत वर्गात सापडणार असतील तर पुढच्या पिढीवर काय संस्कार होणार? हा देखील प्रश्नच आहे.
शिक्षक हा देखील समाजाचाच एक घटक आहे, आज समाजाचेच नैतिक अधःपतन होताना दिसते आहे, अश्यावेळी शिक्षकानेच काय चूक केली? असा प्रश्न शिक्षणक्षेत्रातील समाजधुरीण विचारतात. आपल्याला त्यावर उत्तर देणे कठीण जाते.
असे असले तरी नवा समाज घडवण्याचे कार्य हे शिक्षणातूनच होत असते, अश्यावेळी शिक्षकांनी आपली वर्तणूक आदर्श कशी ठेवता येईल याची काळजी घ्यायला हवी, त्याचबरोबर समाजधुरिणांनीही शिक्षकांची निवड करतांना अश्या व्यसनी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रातून दूर करायला हवे. तरच शिक्षणक्षेत्र सुधारेल आणि समाज देखील उन्नत होऊ शकेल.
तोवर तरी असे व्यसनी शिक्षक हे समाजाला कलंकच ठरणार आहेत.

अविनाश पाठक

Leave a Reply