नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दोन्ही गटाला संमिश्र यश

नागपूर : २३ नोव्हेंबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचार्य, व्यवस्थापन मतदारसंघात शिक्षण मंचाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महाआघाडीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सर्व एकत्रित असतानाही प्राचार्य गटात सर्वाधिक जागा मंचच्या उमेदवारांनी जिंकल्या. तर शिक्षक गटात आघाडीने विजयाची आघाडी घेतली. व्यवस्थापन परिषदेतही आघाडीपेक्षा मंचचे अधिक उमेदवार विजयी झाले आहेत.
महाआघाडीचे नेतृत्व करीत असलेले ॲड. अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांच्या परिवारातील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यापीठ अधिसभा, विद्वात परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. विद्यापीठ शिक्षक मतदारसंघातून महाआघाडीचे तीनही उमेदवार विजयी झाले. यात खुल्या वर्गातून ओमप्रकाश चिमणकर, अनुसूचित जमाती वर्षा धुर्वे तर महिला गटातून पायल ठवरे यांचा समावेश आहे. या गटात अपक्ष उभे असलेले राहूल खराबे यांनी चिमणकर यांना चांगलीच टक्कर दिली. शिक्षक गटात शिक्षण मंचाला हवे तसे यश मिळवता आले नसले तरी व्यवस्थापन प्रवर्गाच्या पाच जागांमध्ये शिक्षण मंचाचे अजय अग्रवाल, उमेश तुळसकर आणि आर.जी. भोयर विजयी झाले. प्राचार्य प्रवर्गातील दहा जागांमधून मंचाला सहा जागांवर विजय मिळवता आला.
विद्यापीठाशी संलग्नित सर्वाधिक महाविद्यालये ही काँग्रेसची असतानाही व्यवस्थापन गटातून महाआघाडीला आवश्यक यश मिळवता आले नाही, हे विशेष. प्राचार्य गटात महाआघाडीला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला. यामध्येही तायवाडे यांच्या पत्नी डॉ. शरयू तायवाडे विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केवळ परिवारातील जागांवरच अधिक लक्ष दिल्याचे बोलले जात आहे.
नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांच्या मतमोजणीसाठी यंदा कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विद्यापीठाने सुरुवातीला केवळ उमेदवार किंवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते व त्या दृष्टीने पासेसदेखील वाटण्यात आल्या. मात्र दुपारनंतर कुणाचीही पास कुणीही घेऊन फिरताना दिसून आले. एकदा मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर अनेक जण तेथेच घुटमळताना दिसले.
विजय उमेदवार विद्यापीठ शिक्षक
ओमप्रकाश चिमणकर महाआघाडी
वर्षा धुर्वे महाआघाडी
पायल ठवरे महाआघाडी
व्यवस्थापन प्रवर्ग
डॉ. बबनराव तायवाडे महाआघाडी
स्मिता वंजारी महाआघाडी
अजय अग्रवाल शिक्षण मंच
उमेश तुडसकर शिक्षण मंच
आर. जी. भोयर शिक्षण मंच
प्राचार्य गट
महेंद्र ढोरे शिक्षण मंच
निळकंठ लंजे शिक्षण मंच
सचिन उंटवाले शिक्षण मंच
जयवंत वडते शिक्षण मंच
रामदास आत्राम शिक्षण मंच
देवेंद्र भोंगाडे शिक्षण मंच
जगदीश बाहेती महाआघाडी
संजय धनवटे महाआघाडी
शरयू तायवाडे महाआघाडी
चंदू पोपटकर महाआघाडी

Leave a Reply