ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

मुंबई : २३ नोव्हेंबर – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या 15 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. विक्रम गोखले रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत असल्याचं कळत आहे. विक्रम गोखले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्या भारदस्त अभिनयानं सिनेमाला चार चांद लावले. लागलं का पाणी मारूतीच्या पायाला संपूर्ण सिनेमात त्यांच्या तोंडी एकच वाक्य ऐकायला मिळतं. पण ते एक वाक्य विक्रम गोखले यांनी ज्या पद्धतीनं सादर केलं आहे त्याला तोड नाही. सिनेमातील विक्रम गोखलेंच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याचप्रमाणे विक्रम गोखले काही दिवसांआधी स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसले होते. मालिकेत विक्रम गोखलेंची खास एंट्री दाखवण्यात आली होती. मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या गुरूंची भूमिका विक्रम गोखलेंनी साकारली होती. अनेक वर्षांनी तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्तानं विक्रम गोखले टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले.
विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply