यवतमाळ आता महाबळेश्वरपेक्षाही थंड

नागपूर : २२ नोव्हेंबर – विदर्भात थंडीचा कडाका सुरुच असून, सोमवारीही थंडीची तीव्र लाट कायम राहिली. यवतमाळ, गोंदियासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये लाटेचा जोरदार प्रभाव दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही यवतमाळचे तापमान कमी नोंदवले गेले.
थंडीच्या लाटेने अख्ख्या विदर्भाला आपल्या कवेत घेतले आहे. यवतमाळमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. येथे नोंद झालेले १०.० अंश सेल्सिअस तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी होते.महाबळेश्वर येथे १०.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. यवतमाळपाठोपाठ गोंदिया येथे सर्वात कमी १०.५ तापमानाची नोंद करण्यात आले. नागपूरचा पारा मात्र ११.४ अंशांवर कायम राहिला. बुलडाणा (११.६ अंश सेल्सिअस), अमरावती (११.७ अंश सेल्सिअस), अकोला (१२.० अंश सेल्सिअस) व वर्धा (१२.२ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही थंडीच्या तीव्र लाटेचा प्रभाव जाणवला.
कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागातीलच नव्हे, शहरवासीही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहात असल्यामुळे स्वेटर्स व जॅकेट्स घालून फिरावे लागत आहे. शिवाय शेकोट्यांचा आधारही घ्यावा लागत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने या आठवड्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून वैदर्भींची सुटका शक्य नाही.

Leave a Reply