संपादकीय संवाद – राज्यपालांच्या भाषणात छत्रपतींचा अवमान झाल्याचे जाणवत नाही

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज आणि आजच्या युगातील राजकीय नेते यांची तुलना केली, त्यावरून महाराष्ट्रात राज्यपाल विरोधकांनी राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी राज्यपालांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत, तर विरोधी नेत्यांनी त्यांच्या निषेधात निवेदने देखील दिली आहेत. एकूणच राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टिकेवरून तापलेल्या वातावरणाला उत्तर देण्यासाठी विरोधकांनी राज्यपालांचे हे विधान तापवलेले दिसते आहे.
राज्यपालांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले आणि त्यातील मजकूर काळजीपूर्वक वाचला तर त्यांनी केलेल्या वक्तव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही अवमान केल्याचे सकृतदर्शनी तरी जाणवत नाही, राज्यपालांनी आजच्या पिढीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून तर नितीन गडकरींपर्यंत महाराष्ट्रातील नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ही तुलना करतांना शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो होते, तर आजच्या काळात आंबेडकरांपासून तर नितीन गडकरींपर्यंत सर्व नेते तरुणाईचे रोल मॉडेल असायला हवे, अश्या आशयाचे विधान त्यांनी केले. यात त्यांनी छत्रपतींचा अवमान केलेला नाही, त्याच बरोबर गडकरी किंवा आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहेत असेही म्हटलेले नाही. ३०० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीत छत्रपतींनी जे काही केले, ते स्पृहणीयच होते, मात्र आज काळ बदलला आहे, आज तंत्रज्ञानाच्या मदतीने जग जोडले गेले आहे. अश्यावेळी नवा विचार मांडणारे आणि नव्या संकल्पना वास्तवात आणणारे नेते, हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच आजच्या तरुणाईचे रोल मॉडेल असावे असे राज्यपालांनी सुचवल्यास त्यात वावगे काहीही नाही.
असे असले तरी कोणत्याही मुद्द्यावरून राजकारण करायचे ही सर्वच राजकीय नेत्यांची सवय आहे, त्यातही महाआघाडी सरकार असतांना त्यांच्या चुकीच्या पद्धतींना राज्यपालांनी केलेला विरोध लक्षात घेत महाआघाडीतील सर्वच पक्ष राज्यपालांवर खवळलेले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्यातून सोयीचे अर्थ काढायचे आणि त्यांच्या नावाने गदारोळ करायचा ही या महाआघाडीच्या नेत्यांची कार्यपद्धतीच झाली आहे.
नेत्यांना राजकारण करायचे असल्यामुळे ते आपल्या सोयीचे अर्थ लावतात आणि गोंधळ घालतात. मात्र महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, त्यांनी राज्यपालांचे भाषण विचारपूर्वक ऐकले तर त्यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखत गडकरींना मोठे केले नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे जनतेनेच विचार करावा.

अविनाश पाठक

Leave a Reply