राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे – अजित पवार

पुणे : २० नोव्हेंबर – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी या प्रकरणात आता पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी स्वत:हून राजीनामा देणार की केंद्र सरकार त्यांची या पदावरून उचलबांगडी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील, असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांचीपंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून ते विविध मराठा संघटनांनी राज्यपालांच्या या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राजकारण्यापासून इतिहासकारांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे.
विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून आज राज्यभर आंदोलन केलं. कोश्यारी यांचे पुतळे जाळले. त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले, धोतर जाळले, आणि जोरदार घोषणाबाजी करत कोश्यारी यांचा निषेध नोंदवण्यात आला.
त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. हे वातावरण तापलेलं असतानाच आता अजित पवार यांनी राज्यपालांवर सडकून टीका करतानाच त्यांना पायउतार होण्याचा सल्लाही दिला आहे.

Leave a Reply