भाजपने काँग्रेस नेत्यांची बदनामी करणे थांबवावे आम्ही संघ आणि भाजपबद्दल सत्य सांगणे बंद करू – जयराम रमेश

बुलढाणा : २० नोव्हेंबर – भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू, असा टोला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी भाजपला लगावला आहे. मागील काही दिवसात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीवरून राज्यातील वातावरण तापले होते. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. जळगाव जामोद येथील पत्रकार परिषदेत जयराम रमेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असल्याचे काँग्रेसने म्हटले. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेन्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूर समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? असा संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

Leave a Reply