ट्रकच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

यवतमाळ : १८ नोव्हेंबर – भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नागपूर-पांढरकवडा महामार्गावरील करंजी रोड येथे घडली. आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दाम्पत्याला ट्रकने चिरडल्यामुळे जागोजागी रक्त व मासाचा सडा पडला होता. दुचाकी ट्रकमध्ये अडकल्यामुळे चालकाने ट्रक जागीच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. गोकुलदास शामराव लांडगे (५५) आणि त्यांची पत्नी सुनीता गोकुलदास लांडगे (४५) दोघेही रा. वैशाली नगर गडचांदूर जि. चंद्रपूर अशी मृतांची नावं आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या करंजी रोड येथे दुपारी दुचाकी क्रमांक एमएच-३४- बीएक्स-६७३९ ने दुचाकीस्वार पती पत्नी पांढरकवडाच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या मागून येत असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देत चिरडले. हा ट्रक (क्रमांक युपी-९२ टी-३५६९) कानपूरवरून हैदराबादच्या दिशेने जात होता.
अपघातात दुचाकीस्वार गोकुलदास लांडगे आणि त्यांची पत्नी सुनीता लांडगे गंभीर जखमी झाले होते. पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीने रूग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह महामार्ग मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वसुकार, हेड कॉन्स्टेबल शेख साजिद, अनिल जिरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळावर आधार कार्ड, पॅन कार्ड व दुचाकी लायसन्सच्या प्रतीवरून मृतकाची ओळख पटली आहे. घटना घडताच करंजी महामार्गावर बघण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी जमली होती. तर मृतकांना ट्रकने चिरडल्यामुळे जागोजागी रक्ताचा व मासाचा सडा पडून होता.
घटनेनंतर ट्रकच्या मध्ये दुचाकी अडकल्याने ट्रक चालक हा ट्रक सोडून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. अपघात घडल्यानंतर करंजी महामार्ग मदत केंद्र तसेच पांढरकवडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतकांना उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा पोलिस करीत आहे.

Leave a Reply