ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत

नवी दिल्ली : १६ नोव्हेंबर – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
अमेरिकेत २०२४ साली निवडणुका होणार आहेत. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक आयोगाकडे आपल्या उमेदवारीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा केली असून राष्ट्राध्यपदी विराजनाम होण्यासाठी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. “अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी मी आज रात्री अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करत आहे,” असे डोनाल्ड ट्रम्प आपली उमेदवारी जाहीर करताना म्हणाले होते.
ट्रम्प यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा फ्लोरिडा येथे केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे. याआधी २०१६ साली त्यांनी ही निवडणूक जिंकत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले. त्यानंतर २०२० साली पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र यावेळी त्यांचा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, एकीकडे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली असली तरी, त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने मात्र नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकीत चांगली कामगिरी केली नव्हती. रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित असलेल्या जागांवर विजय मिळालेला नाही.

Leave a Reply