सहा महिन्यात महाराष्ट्रात 100 टक्के मध्यवधी निवडणुका लागणार – विनायक राऊत

मुंबई : १५ नोव्हेंबर – पुढील सहा महिन्यात महाराष्ट्रात 100 टक्के मध्यवधी निवडणुका लागणार, असा दावा ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याने केलाय. खासदार विनायक राऊत यांनी काही ठोस कारणं देत हे भाकित केलं. ते म्हणाले, शिंदे सरकार वैध आहे की अवैध यासंबंधीची केस सुप्रीम कोर्टात सुरु आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, कितीही विलंब केला तरी पुढील सहा महिन्यात हा निकाल लागणार आहे. त्यानंतर हे सरकार कोसळेल, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर आमदारांचं मोठं नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिंदे गटातील धुसपूस चव्हाट्यावर येईल, असं म्हटलं जातंय. त्यातच सहा महिन्यांनी हे सरकार कोसळणार असल्याचं भाकित विनायक राऊत यांनी केलंय.
विनायक राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ सुप्रीम कोर्टात सुरु असलेली केस कायदेतज्ज्ञांच्या मते कितीही विलंब केला तरी जानेवारीपर्यंत या केसचा निकाल लावावाच लागणार आहे. त्यानंतर कदाचित राष्ट्रपती लागेल आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील, असं भाकित विनायक राऊत यांनी वर्तवलंय.
महाविकास आघाडी सरकारचे 13 ते 14आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र खासदार विनायक राऊत म्हणाले, हे स्वप्न पहातच बसावी त्यांनी… शेवटची गद्दारी दोन दिवसांपूर्वी झाली. ती आम्हाला अपेक्षित होती. त्यामुळे त्या गद्दारीचं फार मोठं वैषम्य वाटलं नाही. बेईमानी करून त्यांनी ते थांबले नाहीत. शिवसेनेच्या अस्तित्वाला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत..असं राऊत म्हणाले…
शिंदे गटातील काही नेते पुन्हा उद्धव ठाकरे गटात येण्याच्या चर्चांवर विनायक राऊत म्हणाले, ‘ शिंदे गटातल्या लोकांना पुन्हा प्रामाणिक आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या घरात घ्यावं कुणालाच वाटत नाही. आमच्या संपर्कात नसले तरी एकमेकांच्या मानेवर बसत आहेत. तात्पुरते गळ्यात गळे घातलेत पण आता गळे ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु झालाय.’

Leave a Reply