वाशिममध्ये भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी, एक कार्यकर्ता गंभीर जखमी

वाशिम : १५ नोव्हेंबर – काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज नववा दिवस असून ही यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. मात्र, सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
राहुल गांधी यांची वाशिममध्ये यात्रा पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेत पायी चालणारा एक यात्री वाशिम जिल्ह्यातील राजगाव परिसरातील गर्दीत चेंगराचेंगरी होऊन गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या या पदयात्रेला हिंगोली तालुक्यातील फाळेगाव फाटा येथून सुरुवात झाली आहे. आज दुपारी वाशिम तालुक्यातील बोराळा येथे विश्रांती तर रात्रीचा मुक्काम वाशिम येथे असणार आहे. राजगांवच्या मराठवाडा – विदर्भ सीमेवर यात्रेचं पारंपारिक मराठी संस्कृती नुसार जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.
गांधी घराण्यातील सोनिया गांधी या 1999 मध्ये वाशिममध्ये आल्या होत्या. त्यांनंतर 23 वर्षा नंतर राहुल गांधी वाशिम मध्ये आले आहेत. भारत जोडो यात्रेत नाना पटोले,माणिकराव ठाकरे,माजी मंत्री यशोमती ठाकूर,आमदार अमित झनक यात्रेत सामील झाले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचे आज सकाळी विदर्भात आगमन झाले. नक्षलवादी चळवळीच्या हिट लिस्टवर असलेले नक्षलविरोधी फोर्स निर्माण करणारे छबिद्र कर्मा आज यात्रेत आपल्या सुरक्षा यंत्रणासह सहभागी झाले आहेत. राहुल गांधी आणि मी आपल्या कुटुंबीयांना देशासाठी गमावलेले आहे. देशात भीतीचे वातावरण आहे. मात्र मी कुणालाही घाबरत नाही. यात्रेला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने आता बदल होणारच असा विश्वास कर्मा यांनी व्यक्त केला.

Leave a Reply