अरुण गवळीला पोलीस सुरक्षेशिवाय पॅरोल मंजूर

नागपूर : १५ नोव्हेंबर – कुख्यात गुंड अरुण गवळी खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यातच अरुण गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मुलाच्या लग्नासाठी कारागृह प्रशासनाने गवळीला पॅरोल मंजूर केला आहे. यापूर्वीही अनेकदा अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला होता.
अरुण गवळीच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न आहे. त्या पार्श्वभूमीवर पॅरोलची मागणी अरुण गवळीकडून करण्यात आली होती. त्यानुसार अरुण गवळीला ४ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. या पॅरोलमध्ये पोलीस सुरक्षेसह अरुण गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आली होती. त्यासाठीचा खर्चही अरुण गवळीला करावा लागणार होता.
मात्र, याविरोधात अरुण गवळीने न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या सुरक्षेशिवाय अरुण गवळीला मुंबईस जाता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा तुरुंगाबाहेर आला होता. मुलाच आणि मुलीच लग्न, आजारपण अशी कारणे देत बाहेर आलेला.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Leave a Reply