भय, भ्रम, चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारे, चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात – अमोल मिटकरी

अकोला : १४ नोव्हेंबर – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भय, भ्रम, चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारं आहेत, असे डॉ. बाबासाहेब म्हणाले होते. चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात. आव्हाड साहेब आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहात”, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय एका महिलेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत आव्हाडांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे.
“पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,” असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

Leave a Reply