भंडाऱ्यातील ग्रामपंचायत ग्रामस्थांना देत आहे आंघोळीचे गरम पाणी

भंडारा : १४ नोव्हेंबर – हिवाळा सुरू झाला की आंघोळीसाठी हिटर, गॅस, शेगडी किंवा चुलीवर पाणी गरम केले जाते. आता थंडी पडायला सुरवात झाली आहे. वाढत्या थंडीमुळे रेंगेपार (कोहळी) ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी एक उबदार निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना आंघोळीसाठी मोफत गरम पाणी दिले जात आहे.
लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) हे १८७९ लोकसंख्येचे गाव. येथील ग्रामस्थांना थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करता यावी, यासाठी ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेद्वारे चालणारा ‘वॉटर हिटर’ लावून घेतला आहे. यातून १२० कुटुंबांना सकाळी ४ तास आंघोळीसाठी गरम पाणी मोफत मिळत आहे. ग्रामपंचायतीला बक्षीस स्वरुपात मिळालेल्या निधीतून हा ‘सोलर हिटर’ लावण्यात आला असून आता याच्या लाभ गावकऱ्यांना मिळतो आहे.
ग्रामीण भागात सरपणाच्या (लाकडाच्या) सहाय्याने चालणाऱ्या चुलीवर पाणी गरम केले जाते. मात्र, आता ग्रामपंचायतीने गरम पाण्याची व्यवस्था केल्याने ग्रामस्थ विशेषत: महिलांचे काम कमी झाले आहे. शिवाय, गॅसचे दरही अधिक असल्याने पाणी गरम करण्यासाठी गॅसच्या वापर परवडणारा नाही. पैशाची बचत होऊन लाकडासाठी वृक्षाची कत्तल थांबल्याने पर्यावरणाचे नुकसानही कमी होण्यास मदत होईल. गावकऱ्यांना नळ योजनेद्वारे मुबलक पाणी दिले जाते. गरम पाणी पुरविण्याची कल्पना त्यातूनच आली. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून सौर ऊर्जेद्वारे गरम पाणी गावकऱ्यांना दिले जात आहे, अशी माहिती रेंगेपर कोहळीचे सरपंच मनोहर बोरकर यांनी दिली.

Leave a Reply