जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाणे : १४ नोव्हेंबर – जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. एका महिलेला ढकलल्याचा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडले आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे.
‘काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या,’ अशी मागणी या महिलेने केली आहे.
दरम्यान हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यावरूनही आव्हाड अडचणीत आले होते. ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा शो बंद पाडला, यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. शनिवारी जितेंद्र आव्हाड यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave a Reply