८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड

नागपूर : १२ नोव्हेंबर – कळमन्यातील एका मजूर दाम्पत्याच्या ८ महिन्यांच्या मुलाचे एका टोळीने अपहरण केले. त्या बाळाची ५ लाख रुपयांत विक्री केली. तक्रार येताच शहरातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिताफीने तपास करीत या टोळीचा अवघ्या पाच तासात छडा लावला. बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. बाळ विक्री करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली तर तीन जण फरार झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी आयुक्तालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
कळमना परिसरात राजू आणि राजकुमारी निशाद नावाचे मजूर दाम्पत्य आपल्या ८ महिन्यांचा मुलगा जीतूसह राहतात. त्यांच्या मुलावर बाळ विक्री करणाऱ्या टोळीची नजर होती. त्यांनी लगेच सापळा रचला आणि दाम्पत्याच्या घरासमोर टोळीतील दोन सदस्य योगेंद्र प्रजापती (कोटा, राजस्थान) आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती यांना दोन चिमुकल्यांसह शेजारी म्हणून राहायला पाठवले. गेल्या २५ दिवसांपासून रिटा आणि योगेंद्र यांनी त्या दाम्पत्याच्या घरी येणे-जाणे करून ओळख वाढविली. त्यांच्या मुलाला घरी नेणे आणि बाहेरून फिरवून आणण्याचे नाटक सुरू केले. रिटावर पूर्ण विश्वास बसताच त्यांनी बाळाच्या अपहरणाचा कट रचला. गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रिटाने बाळाला घेतले आणि फिरवून आणण्याचा बहाणा करून घेऊन गेली. ती चार वाजेपर्यंत न आल्याने त्यांना संशय आला. दोघेही रिटाच्या घरी गेले. तिच्या घराला कुलूप होते. त्यामुळे त्यांनी वस्तीत त्यांचा शोध घेतला. शेवटा रात्री ११ वाजता ते कळमन्याचे ठाणेदार विनोद पाटील यांच्याकडे गेली. त्यांनी लगेच तीन पथकांना शोध मोहिमेसाठी रवाना केले तसेच वरिष्ठांना माहिती दिली. रात्री अकरा वाजता स्वतः आयुक्त, अति. आयुक्त आणि सर्वच उपायुक्त कळमना ठाण्यात पोहचले. त्यांनी तपासाची दिशा ठरविली. बाळाचे अपहरणकर्ते शहराबाहेर जाऊ नये म्हणून पूर्ण शहर सील केले. परिसरातील सीसीटीव्ही, ऑटोचालक, मजूर यांच्याकडे पोलीस चौकशी सुरू केली.
बाळाचा फोटो घेऊन पोलीस वस्तीत फिरत असताना बबलू नावाच्या ऑटोचालकाने सहकार्य केले. ऑटोतून ही महिला प्रवाशी जेथे गेली तेथे त्यांना सोडले. पोलिसांनी लगेच त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढले. ती महिला आयेशा ऊर्फ श्वेता खान होती. तिच्यावर यापूर्वीच २ बाळ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेतले आणि मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली.
बाळाचे अपहरण होताच यशोधराचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, कळमन्याचे विनोद पाटील, पारडीचे मनोहर कोटनाके, गुन्हे शाखेचे किशोर पर्वते, गणेश पवार, एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ, सायबरचे बलराम झाडोकार, मिथून नाईक, पराग यांनी धावपळ सुरू केली. परिसरातील सर्वच सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन, कॉलडाटा आणि गुन्हेगारांची तपासणी सुरू केली. शेवटी बाळ विक्री करणाऱ्या टोळीतील सदस्य सीसीटीव्ही दिसताच पोलिसांनी अवघ्या पाच तासांत बाळाचा शोध घेतला.

Leave a Reply