संपादकीय संवाद – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असे घटनाबाह्य वर्तन शोभले नाही

ठाण्यातील विवियन मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण करण्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल दुपारी ठाणे पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर जाऊन गोंधळ घातला, परिणामी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
आव्हाडांच्या या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला आहे, निषेध करतांना त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत. हर हर महादेवमध्ये इतिहासातील तथ्यांची तोडमोड करून चित्रीकरण केले असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कलंकित केले जात आहे, असाही विरोधकांचा दावा आहे. आव्हाडांना अटक केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांना अटक करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या अवमानाला सहमती दर्शवणे असा अर्थ असल्याची टीका केली आहे.
इतिहासातील तथ्यांची तोडमोड केली हा आरोप खरा मानलाही तरी त्याचा विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहेत, उच्च न्यायालयातून लगेचच स्थगिती मिळवता आली असती, मात्र तसे न करता चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा खेळ बंद पडणे आणि त्यानंतर बाहेर निघालेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे म्हणजे कायदा हातात घेणेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कायम घटनेचा आदर केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करत असतात, मग त्यांचाच एक नेता घटनेचा अनादर करतो हे कितपत योग्य आहे? आव्हाड यांनी असे काहीच केले नाही असा दावाही त्यांचे समर्थक करीत आहेत, मात्र आव्हाड मारहाण करतांना सर्व चित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे आव्हाडांनी मारहाण केलीच नाही, असे म्हणणे हा शुद्घ कांगावेखोरपणाच ठरतो.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आणखी एक नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना अटक करण्यासाठी वरून दबाव होता, असा आरोप केला आहे. या आरोपात तथ्य असू शकते, आव्हाड हे स्थानिक आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत, त्यामुळे आपला दबाव वापरून ते अटक टाळू शकत होते, मात्र अटक टाळणे बेकायदेशीर ठरले असते, पोलिसांनी असे बेकायदेशीर कृत्य करू नये म्हणून जर मंत्रालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी दबाव आणला असेल तर त्यात वावगे काहीही नाही.
एकूणच हे सर्व प्रकार बघता आपला तो बाब्या आणि लोकांचे ते कार्टे या न्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते वागत आहेत, असे दिसते. आम्हाला जी गोष्ट पातळी नाही, तिला विरोध करण्यासाठी आम्ही केव्हाही कायदा हातात घेऊन मात्र आम्हाला अडवू नका आमच्यावर कारवाई करू नका असे म्हणणे हेच बेकायदेशीर आहे. आणि आम्ही घटनेचे संरक्षक आहोत,असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे घटनाबाह्य कृत्य केले आहे, याची इतिहास नोंद घेईलच.

अविनाश पाठक

Leave a Reply