हिमाचलमध्ये भाजपची जुमला नीती चालणार नाही – मल्लिकार्जुन खर्गे

सिमला : १० नोव्हेंबर – काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांनी हिमाचल प्रदेशमधील प्रचारसभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘‘भाजप त्यांच्या ‘जुमला’ नीतीने देशभरातील नागरिकांना फसवू शकतो, पण हिमाचलमधील जनतेला नाही. येथील नागरिक सुशिक्षित आहेत, समजूतदार आहेत आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ शकते,’’ असे ते म्हणाले. खर्गे यांची पहिली प्रचार सभा बुधवारी झाली. ते म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार आणि रोजगाराच्या ‘जुमल्या’ने भाजप देशभरातील नागरिकांची फसवणूक करू शकतो, पण येथे हे चालणार नाही.
खर्गे यांचे काल हिमाचल प्रदेशमध्ये आगमन झाले. सिमला ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विक्रमादित्यसिंह यांच्या प्रचारार्थ खर्गे यांची जाहीर सभा आज बानुती येथे झाली. जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने काँग्रेस पूर्ण करेल. पक्ष सत्तेवर आल्यास पहिला निर्णय जुनी निवृत्तिवेतन योजना (ओपीएस) लागू करण्याचा असेल. हे आमचे वचन आहे. आम्हाला संधी दिल्यास पहिला निर्णय ‘ओपीएस’चा असेल,’’ असे ते म्हणाले.
सभेदरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी हिमाचली टोपी परिधान केली होती. मी मूळचा दाक्षिणात्य असलो तरी हिंदुस्तानी भाषेत संभाषण करणार असल्याचे त्यांनी भाषणापूर्वी सांगितले. मी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे. माझी निवड कशी झाली, हे प्रत्येकाला माहीत आहे. पण भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची निवड कशी झाली याची माहिती कोणालाही नाही. कारण भाजपमध्ये निवडणूक होत नाही तर नामांकन केले जाते. ते काँग्रेसबद्दल बोलत असतात, पण भाजपच्या अध्यक्षीय निवडणुकीत किती उमेदवार होते, असा माझा सवाल आहे.

Leave a Reply