विदर्भात वाढणार थंडीचा कडाका

नागपूर : १० नोव्हेंबर – जवळपास आठवडाभर गायब राहिल्यानंतर थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या दोन दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा घसरला आहे. उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
ऑक्टोबर संपून अर्धा नोव्हेंबर संपत आला तरीही अद्याप पाहिजे तशी थंडी पडत नसल्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना अचानक वातावरण बदलले. दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला असून, तापमानात हळूहळू घट होत आहे. बुधवारी नागपूरसह अनेक जिल्ह्यांचा पारा १५ अंशांवर आला. किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घसरण होत आहे. जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पहाडी भागांत सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. त्याचवेळी पश्चिमेकडून कोरडे वारे विदर्भाच्या दिशेने वाहू लागले आहेत. या दोहोंच्या प्रभावामुळे हवेत गारठा वाढत चालला आहे. कडाक्याच्या थंडीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्याने या आठवड्यात विशेषतः १४ नोव्हेंबरपासून कडाका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील चार-पाच दिवसांत पारा तीन ते चार अंशांनी खाली जाण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
गारठ्यामुळे नागपूरकरांना हुडहुडी भरू लागली आहे. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. पहाटेच्या सुमारास थंडीचा प्रभाव अधिक जाणवतो आहे. थंडीचा सर्वाधिक फटका सध्या ग्रामीण भागांना बसतो आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्या व ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तापमान घसरू लागल्याने अनेकांनी कपाटातील स्वेटर्स, जॅकेट्स, जर्किन्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर काढले आहेत. वाढत्या थंडीमुळे एसीही बंद झाले असून, पंख्यांचीही स्पीड कमी झाली आहे. गारठा वाढल्याने आणि पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे चांगली कमाई होत असल्याने दुकानदारही खुश आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांत विशेषतः दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा विदर्भाला मात्र कसलाही धोका नाही. हा पट्टा आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळमार्गे अरबी समुद्राकडे सरकून कमजोर पडणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Reply