उपचारासाठी नांदेडचा बिबट्या नागपुरात दाखल

नागपूर : १० नोव्हेंबर – वन्यप्राण्यांवरील उपचारासाठी उपराजधानीतील सेमिनरी हिल्सवरील वनखात्याचे ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र वरदान ठरले आहे. सोमवारी नांदेड शहरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी झाले. तब्बल सात तासांच्या प्रवासानंतर त्याला केंद्रात आणले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या बिबट्याचा मागच्या पायाचे हाड मोडले आहे. त्याला प्लास्टर करणे किंवा रॉड टाकणे शक्य नसल्याने सक्तीच्या विश्रांतीनंतरच ते हाड जुळेल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नांदेड शहरातील हिमायतनगर परिसरात सोमवारी दुपारी एका शेतात मादी बिबट्याचे एक वर्षाचे पिल्लू लंगडत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. सुमारे दोनशे मीटरचे अंतर पार केल्यानंतर ते त्याच ठिकाणी पडले. शेतकऱ्यांनी तातडीने नांदेडच्या वनाधिकाऱ्यांना ही माहिती दिली. उपचारासाठी त्याला पिंजऱ्यात घेणे आवश्यक असल्याने त्याला ट्रँक्विलायझिंग बंदुकीने बेशुद्ध करण्यात आले. या पिल्लाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर मंगळवारी दुपारी त्याला नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात पाठवण्याचा निर्णय झाला. रात्री ११ च्या सुमारास नांदेड वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी या जखमी पिल्लाला घेऊन नागपुरात पोहोचले.
केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर बुधवारी सकाळी त्याला क्ष-किरण तपासणीसाठी गोरेवाड्यातील वन्यजीव उपचार व प्रशिक्षण केंद्रात नेण्यात आले. केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये यांनी केलेल्या तपासणीनंतर त्याच्या मागच्या पायाजवळील हाड मोडल्याचे दिसून आले. त्याला प्लास्टर करणे किंवा त्यात रॉड टाकून ते हाड जुळवणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही हालचालीशिवाय सक्तीची विश्रांती मिळाली तरच ते हाड नैसर्गिकरित्या जुळण्याची शक्यता असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. भारत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन काकडे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य व वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते तसेच केंद्राची संपूर्ण चमू त्यावर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply