काकस्पर्श – विजय लिमये

माझ्या जीवनात कावळ्याचे आगमन चिऊ काऊ या गोष्टीतून आले तसे ते तुमच्याही जीवनात झाले असणारच. इथे काऊ म्हणजे आमचा गरीब कावळा हे समजायला फारसा वेळ लागला नाही, बिचाऱ्याचे घर शेणाचे ठरवून माणसाने त्याला निम्नवर्गीय करून टाकला. खऱ्या जीवनात काऊ कधीही चिऊच्या सावलीला सुद्धा गेला नाही, व चिऊने कधी काऊच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले नाही. बाल्य अवस्थेतील या गोष्टी तिथेच सोडून मी वयस्क झालो.

कावळा तसा माणसापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करतो, परंतू अपवाद हा सुद्धा निसर्गाचा नियम असतो, हे मी अनेक वेळा अनुभवले, तसा अपवाद माझ्या ही आसपास घडला आहे. मी कॉलेजला जाण्याच्या गडबडीत, माझा डबा देण्यासाठी, आई साधारण सकाळी दहा वाजता कणिक मळत असताना तीन बुवा दररोज हमखास स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन जोरजोरात काव काव करत, ओरडून आईला खायला दे म्हणून विनवणी करत असत. हे करताना त्यांची एक लकब असायची, आवाज करताना त्यांची शेपूट आवाजाच्या लयीत वरखाली होत असे, हे होताना, मान तिरकी करून ते कधी आईकडे तर कधी आकाशात पहात असत. आईचा आणि त्यांचे काय ऋणानुबंध होते हे तेच जाणे, ती दररोज “मेल्यांनो थांबा रे किती घाई करता,” असे लडिवाळपणे म्हणे, पण हे भलताच उतावीळ झालेले असत. इकडे तिचा स्वयंपाक करता करता तोंडाचा पट्टा सुरूच असे, “देते रे, थांबा, ओरडू नका.” अनेक वेळेस ती तिघांना एकेरी बोलत असे, “बाळ्याचा डबा भरला की तुला देते, धीर…. धर, किती….. ओरडतोस, देत नाही का तुला,” आणि या शब्दांच्या उत्तरादाखल ते घसा फोडून काव…. काव करत असत. ह्या प्रकारचेअनेक संवाद दोघांच्यात होत असत, त्यांना तिची भाषा खरोखर समजत असे, कारण तिघेही खिडकीच्या बाहेर असलेल्या दांड्यावर बसून उजवीकडे डावीकडे सरकत तिचे बोलणे समाजल्यासारखे भासवत, त्यांच्या या हालचालीला मी थ्री डायमेंशनल हालचाल म्हणत होतो. माझा डबा भरला की त्यांना अर्धी अर्धी पोळी व भाताची मूद दिली जात असे. भात खाल्ला की त्यांचे ओरडणे बंद होई व सर्व उडून जाण्याचा तयारीत असत. त्यातली एक नक्की कवळीण असणार हा माझा अंदाज,!, कारण पोळीचा मोठा तुकडा ती तोंडात धरून भर्रकन उडून जाई, अर्थात हे सांगायची आवश्यकता नाही, तिकडे पिल्ले तिची आतुरतेने वाट पाहत असणार. तिचे घरटे मात्र मला कधीही दिसले नाही. एक तर उडताना सर्व कावळे सारखेच दिसतात, ती कोणत्या पारावर पिल्लाना खायला देत असणार हे खिडकीतून लांबवर नजर नेली तरी दिसत नसे व उडत जाताना ती कधीही सरळ रेषेत गेलेली मी पाहिलेली नाही, कायम पंचेचाळीस अंशतः कोन करून दृष्टीआड होत असे.

शाळेत असताना आमच्या शाळेच्या आवारात असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एक कावळा मरून पडलेला आम्हाला समजले, हे समजायचे कारण त्या दिवशी किमान शंभर कावळे इमारतीवर व झाडावर ठाण मांडून बसले होते, आणि त्यांनी त्या झाडाची नाकाबंदी केली होती. कधीच इतक्या संख्येने कावळे आम्हाला दिसले नाहीत, कदाचित दूर भागातील कावळे ही त्या कार्यक्रमानिमित्त जमले असणार, पण एक शंका नेहेमी मनात येई, निरोप देण्याची अशी कोणती क्लुप्ती त्यांच्याकडे आहे त्यामुळे इतक्या कमी वेळात दूरदूरच्या नातलग अचानक जमले?. त्या दिवशी पहिल्यांदा हे समजले की माणसाप्रमाणे काक बंधू श्रद्धांजली देण्यासाठी असेही एकत्र जमतात. जवळपास चार तास त्यांनी कुणालाही झाडाजवळ फिरकू दिले नाही. आमच्यातील काही अतिशहाणे टारगट, तिकडे मुद्दाम जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना अचानक एखादा कावळा मिसाईल आल्याप्रमाणे येऊन डोक्यात चोच मारून जायचा. एकाला तर त्यामुळे डोक्यात इजा पण झाली, होताच तो जरा दिड शहाणा,असो!. त्या दिवशी मधल्या सुट्टीत शाळेत कवळ्यांच्यामुळे कुठेही जाता येत न्हवते, त्यामुळे लघुशंका सुद्धा तुंबवून ठेवावी लागली. आमच्या लहानपणी आम्ही शाळेच्या बांधावर जिथे कंपौंडची तार लावलेली असे तिथे लघुशंका करण्यासाठी जात होतो. आजकालच्या मुलांच्यासारखे वॉशरूम ही संकल्पना तेव्हा न्हवती… ह्या कावळ्यांचा हा हाहाकार आमच्यासाठी बरेच दिवस चर्चेचा विषय राहिला. संध्याकाळी जेव्हा सर्व कावळे निघून गेले त्यानंतर आमची शाळेतून सुटका झाली, इतकी दहशत त्यादिवशी कावळ्यांनी शाळेत पासरवलेली हे जगातील एकमेव उदाहरण असावे.

बाकी कावळ्यांना आमचे पितर दिसतात हे खरं की खोटं या वादात मी पडणार नाही, यावर फार पूर्वीच पु. ल. देशपांडयानी बऱ्याच कोट्या केल्या आहेत. सार्वपितृ अमावश्याला मात्र याच्या शिवाय आमचे पान हालत नाही, त्याने जेवणाला चोच लावली की आमचे पोटातील कावळे शांत होण्याचा मार्ग सुकर होतो. त्या कावळ्यांना पोटातील कावळ्यांची दया येत असावी म्हणून अंत न पाहता ते आमची सुटका करत असणार. बाकी दहाव्याला मात्र समस्त नातेवाईक त्याची बडदास्त ठेवण्यात कोणतीही हयगय करत नाहीत. अहो काही ठिकाणी त्याने पिंडाला चोच लावावी म्हणून लोक भजी, पकोडे, चिकन व मटण ठेवायला कमी करत नाहीत. इतके करूनही तो कधी कधी शिवत नाहीच, तेव्हा मात्र सर्वाना घोर लागतो. इथेही एक पळवाट असतेच, अगदी नाहीच शिवला तर दर्भाचा कावळा करून शेवटी काम निभावून न्यावे लागते हे त्या चतुर ब्राह्मणांना पक्के ठाऊक असते.

माझी मात्र कावळ्यापरी अपार माया आहे. निसर्गाने हा पक्षी थोडा गमतीदार बनवला आहे. पक्षी साधारण दोन गटात विभागता येतील, शाकाहारी व मांसाहारी. मांसाहार करणाऱ्या पक्षांचे पुन्हा दोन भाग करता येतात, पहिला जे मारून खातात व दुसरे मेलेले प्राणी खातात. कावळा हा दुसऱ्या श्रेणीत बसतो, तो हत्या करण्याच्या वृत्तीचा नसतो. जर प्राणी मेला तरच त्याचे मांस भक्षण करून निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे काम हा इमाने इतबारे करतो. तसा तो अहिंसावादीच असतो असे म्हणायला हरकत नाही.

बाकी कावळा हा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा कारागीर आहे. त्याचे घरटे हे घरटे नसून काड्या, पाने यांचा पसारा असतो असे माझे मत आहे. त्याला काड्या विणून घरटे करणे जमतच नाही. कशातरी काड्या एकमेकात फसवून एकदाचे घरटे बांधणे संपवतो. कावळीण असल्या घरट्यावर खुश होऊन संसारात रमते हे पाहूनच नवल वाटते. बरे आहे, त्या त्यांच्या घरट्याची तुलना चिमण्यांच्या घरट्याशी करत नाहीत, नाहीतर सर्व संसार सुरू होण्याआधीच मोडले असते व कावळा ही प्रजाती भूतलावावरून नष्ट झाली असती.

लहानपणी घरातील स्त्रियाना ठराविक दिवसांनी कावळा का शिवतो हे एक न सुटणारे कोडे असायचे. बरं यांना शिवताना आम्हाला का दिसत नाही? कधी कधी रात्री व पहाटे पण शिवायला यायचा, असे कसे होऊ शकते? असले उपद्व्यापी प्रश्न आम्हाला असायचेच. बरं, तो आम्हा लहानांना, घरातील पुरुष मंडळींना व वयस्क स्त्रियांना का शिवत नाही हे ही एक गूढ होते. बरं शिवला म्हणून काय झाले, त्यासाठी चार दिवस सर्वांच्यापासून लांब रहायचे? इतरांचे सोडा, मला आई शिवाय झोप यायची नाही, व स्वयंपाक पण तिच्याच हातचा लागायचा. त्या चार दिवसात आई मला जवळ येऊ द्यायची नाही, व लांब कोपऱ्यात बसून राहायची. तिला जेवणाचे ताट वाढून हातात दिले जात नसे, तर तिच्या समोर खाली ठेवावे लागायचे, झोपायला गादी नसायची, तिचे हे हाल पाहून कावळ्यांचा भयंकर राग यायचा, इतकी चीड येई की कावळा घराच्या जवळपास भटकला तरी दगड मारून हुसकावून देत होतो, बाल बुद्धीला साजेसे अनेक वेळा अनेक शाप पण दिले. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, ही म्हण सार्थ करत, मीच कसा कावळा झालो हे ही कळत न्हवते.पुढे मोठे झाल्यावर हे कोडे अलगद सुटले, पण न कळण्याच्या वयात असले प्रश्न घरातील लोकांना विचारले की फक्त पाठीत कोडे पडायचे बाकी रहायचे. बाकी कावळ्याला बदनाम करून काय मिळवले देव जाणे! मी म्हणेन गरीब बिचाऱ्या कावळ्यावर हा अन्यायच मानवजातीने केला आहे.

कवळ्याइतका दैनंदिन जीवनात दुसऱ्या कुठल्या प्राणाचा वा पक्षांचा वापर खचितच केला गेला असणार. त्याच्या नावाचा वापर असा करताना, स्वयंपाक खोली तरी कशी सुटणार? स्वयंपाकात तेल वापरण्याच्या भांड्याला कावळा हे नाव देऊन इतर ठिकाणी त्याला दिलेल्या हीन वागणूतिच्या पापातून काही अंशी तरी सुटका करून घेण्याचा तर प्रयत्न नसणार ना? असा एक फालतू विचार मनात येऊन गेला.

जाता जाता लता दिदींच्या एका गाण्याची आठवण झाली, त्याच्या बद्दल चार शब्द लिहिल्याशिवाय माझी काव काव बंद करता येणार नाही. यांनी म्हटलेला “पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे”, हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग ऐकताना हे ही समजले की, काक बुआ घराबाहेर बसून जोरजोरात ओरडून, लवकरच तुमच्या घरी पाहुणे येणार हे ही सांगतात. सदाशिव पेठी लोक मात्र, काक भाऊंचा हा संकेत ओळखून कावेबाज बनून, पाहुणे ही बला टाळण्यासाठी घराला कुलूप लावून दुसऱ्यांच्याकडे पाहुणे होऊन जातं असावेत. बाकी, काकभाऊंचा हा संकेत आम्हा बालगोपाळांसाठी एक शुभ संकेत राही, असे म्हणायला हरकत नाही. आमच्या लहानपणी पाहुणे येणार म्हणून आम्हाला अत्यानंद होत असे, कारण येताना ते खाऊ आणत व जाताना खाऊसाठी पैसे देत असत. मुंबईत राहणाऱ्या लोकांना मात्र हा नक्कीच अशुभ संकेत ठरत असणार.

माझ्या अल्प बुद्धीला कावळा जितका समजला त्यातील काही अंश मांडण्याचा माझा हा प्रयत्न. बाकी, तुम्ही शेवटपर्यंत न कंटाळता, चिकाटी ठेऊन हा लेख वाचला असल्यास माझा काकस्पर्श नक्कीच नुसता काव काव न राहता, तुम्हाला कावळा या पक्षाबद्दल आपुलकी जागृत करेल अशी आशा करतो.

विजय लिमये (9326040204)
समाजमान्य यावरुन साभार…….

Leave a Reply