ऑडिओ क्लिप ऐकवून महिलेला शरीरसुखाची मागणी करणारा दुकानदार गजाआड

नागपूर : ९ नोव्हेंबर – एक संतापजनक घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आलीय. एका महिलेला ब्लॅक मेल करुन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वयस्कर दुकानदाराला अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं वय 58 वर्ष असून त्याचं नाव इंद्रदेव घनसानी असं आहे. सध्या अटेकेतील आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे. नागपूरमधील जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. सध्या पुढील तपास केला जातोय.
इंद्रदेव घनसानी हे हार्डवेअरचं दुकान चालवतात. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी इंद्रदेव यांनी पीडितेला फोन करुन दुकानात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर ही महिला दुकानात पोहोचल्यानंतर तिला काही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवले होते.
पीडित महिलेचे काही लोकांशी अनैतिक संबंध असल्याचा हा पुरावा आहे, असं आरोपीनं पीडितेला सांगितलं. ही ऑडिओ क्लिप मी व्हायरल करेल, अशी धमकी आधी दुकानदाराने दिली. त्यानंतर पीडितेकडे आरोपीने शरीर सुखाची मागणी केली, असा आरोप पोलीस तक्रारीतून करण्यात आलाय.
इतकंच नव्हे तर ऑडिओ क्लिप व्हायरल करायची नसेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही आरोपीने केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणात घाबरलेल्या महिलेनं आधी पोलीस स्टेशन गाठलं. जरीपटका पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली.
अखेर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी इंद्रदेव घनसानीविरोधात वसुली, ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात हनी ट्रॅपचा काही संबंध आहे का? याचाही तपास केला जातो आहे. काही व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडे महिलांना पाठवून त्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्ड करुन धमकावल्याची काही प्रकरणं आहेत का, या अनुषंगानेही पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply