सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका कधीही लागतील – यशोमती ठाकूर

अमरावती : ६ नोव्हेंबर – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका कधीही लागतील, असा अंदाज ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यशोमती ठाकूर म्हणाल्या, “राज्यात ज्या प्रकारे स्थापन झालं, ते असंवैधानिक आहे. सर्वोच्च न्यायालय न्याय देईल, ही अपेक्षा आहे. पण, न्याय मिळण्यासाठी उशीर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका लागतील. उद्धव ठाकरे बोलले ते योग्यच आहे.”
भारत जोडो यात्रे’त पहिल्या टप्प्यात दिसणारे काँग्रेसचे नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत, असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. याला यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आरएसएस आणि भाजपा या दोन्ही संस्था अफवा पसरवण्याचे काम करतात. आम्ही सगळ्यांना सन्मानजनक वागणूक देतो, त्यांच्याकडून मिळण्याची अपेक्षा आहे. ‘भारत जोडो यात्रा’ एक पक्षाची नाही आहे. संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, महागाईच्या विरोधातील ‘भारत जोडो’ हे आंदोलन आहे,” असं यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply