भविष्यात आदिवासींसाठी स्वतंत्र क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार – नितीन गडकरी

नागपूर : ६ नोव्हेंबर – आदिवासीबहुल भागात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास सुरू आहे. नक्षलवादाने मागास राहिलेल्या क्षेत्रात आता शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. आदिवासी क्षेत्रातील मुला-मुलींमधील क्रीडाकौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भविष्यात आदिवासींसाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या धर्तीवर स्वतंत्र क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
एकल अभियान ग्राम स्वराज मंच योजनेच्या एकल अभ्युदय युथ क्लबच्या एकल ग्राम संगठन, वनबंधू परिषद व श्री हरी सत्संग समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला एकल अभियानचे राष्ट्रीय महामंत्री माधवेंद्र सिंह, सामाजिक कार्यकर्ते निखिल मुंडले, आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. अमित समर्थ, सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर, माजी महापौर संदीप जोशी, विभाग अध्यक्ष अशोक तापडिया, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, राष्ट्रीयस्तरावर एकल अभियान तर विदर्भस्तरावर मानकर ट्रस्ट अंतर्गत एकलव्य एकल विद्यालयांच्या मार्फत ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, सेवा आणि विकास या क्षेत्रात काम सुरू आहे. आदिवासी आणि अनुसूचित जाती समाजात सिकलसेल आणि थॅलेसिमिया या रोगाचा प्रभाव आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनासोबत सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी माधवेंद्र सिंह यांनी एकल अभियान ग्रामीण व वनवासी भागात शिक्षण प्रचार व प्रसाराचे काम करीत असल्याचे सांगितले. किशोर हेकडे यांच्या मार्गदर्शनात परतवाडा, गोंदिया, पांढरकवडा, किनवट, आम्रपाली, नाशिक, घोटी, वाडा, शहादा, नारायणगाव क्षेत्रातून बाल-बालिका खेळाडूंनी पथसंचलन केले. दीपाली गाडगे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. आयोजक एकल ग्राम संघटना अध्यक्ष अरुणा पुरोहित, वनबंधू परिषद, नागपूर चॅप्टर अध्यक्ष रामअवतार अग्रवाल आणि श्री हरी सत्संग समिती, नागपूर चॅप्टर अध्यक्ष कृष्णाजी दायमा, महादेव घोडके, संतोष सोले, आमदार नागो गाणार, रामभाऊ माताडे, प्रा. संजय भेंडे, दुष्यंत देशपांडे उपस्थित होते.
खासदार सांस्कृतिक महोत्सवात बालकांना चमकण्याची संधी
बालकला अकादमी नागपूरतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सवात एक वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी आठ नोव्हेंबरला निवड चाचणी होणार आहे. सेवासदन, सीताबर्डी येथे सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान या ऑडिशन्स होतील.
गायन, वादन, नृत्य, अभिनय अशा विविध कलांनी युक्त अशा या बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इयत्ता पहिले ते दहावीचे विद्यार्थी पात्र आहेत. मंगळवारी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या निवड चाचणीत विद्यार्थ्यांनी आपली गायन, वादन, नृत्य व नाट्य कलेतील प्रतिभा सादर करायची आहे. तबला, बासरी, व्हायोलिन, की-बोर्ड इत्यादी स्वर व तालवाद्य सोबत आणायचे आहे.

Leave a Reply