पंतप्रधानांकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता नाही – शरद पवार

शिर्डी : ६ नोव्हेंबर – पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकताही हवी. परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नाही. राज्यातील प्रकल्प गुजरातकडे वळवले. सरकारच्या डोळय़ांदेखत प्रकल्प जाणे ही लाजिरवाणी गोष्ट असून टाटा एअरबस प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्र सरकारने संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत करण्याकडे लक्ष द्यायला हवे होते. विमानांचे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ असताना या प्रकल्पांकडे नवीन काम नाही. वायुदल शक्तिशाली करण्यासाठी रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन लढाऊ विमाने निर्मिती करण्याचा प्रकल्प बंगलोर, नाशिक व लखनऊ येथे उभारले. प्रधानमंत्र्यांनी या तिन्ही प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी कष्ट घेतले असते तर मी त्यांचे स्वागत केले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
शिर्डी येथील ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय शिबिराचा शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांचे भाषण थोडक्यात झाले, मात्र त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पक्षाचे नेते दिलीप वळसे यांनी शरद पवारांचं उर्वरित भाषण वाचून दाखवले. या वेळी पवार यांनी सांगितले,की केंद्र व राज्यातील नेतृत्वामधील धोरणात अंतर असू शकते. केंद्रातील सत्तेने त्यांचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यांमध्ये केंद्रातील सत्तेच्या विचारांशी सहमत नसलेले सरकार आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. अगदी कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील जनतेने देखील भाजपाला दूर ठेवले होते. परंतु केंद्रातील सत्ताधीशांनी यंत्रणांचा वापर करून विधानमंडळ सदस्य फोडून या राज्यांमधील सत्ता हस्तगत केली अशी टीकाही पवार यांनी केली.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एक सुसंस्कृत नेता असा स्वत:चा लौकिक कायम ठेवला. त्यांनी प्रशासकीय निर्णय घटनेची विशिष्ट चौकट ओलांडली नसल्याचा शरद पवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

Leave a Reply