नाणार राहणार कि जाणार ?

कोकणात येऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची चर्चा गेले पाच वर्षे सुरु आहे प्रकल्प नक्की काय आहे ते न बघताच या प्रकल्पाला स्थानिकांच्या नावाखाली राजकीय विरोध सुरु आहे. आपण अशा प्रकल्पना विरोध करतो या बातम्या वाचून इतर देशातील लोक नक्कीच आपल्यावर हसत असतील आणि का हसू नये ? आपण समजून घेतलाय का प्रकल्प ?

14000 हेक्टर वर होणाऱ्या या प्रकल्पात जवळपास तीन लाख कोटींची गुंतवणूक असणार आहे सौदी अरेबियाची कंपनी आरामको व भारत सरकारच्या तिन्ही पेट्रोलियम कंपन्या यांच्या भागीदारीत हा प्रकल्प नियोजित आहे जवळपास एक लाख रोजगार निर्माण करणाऱ्या या प्रकल्पामुळे कोकणाचा विकास तर होईलच परंतु कच्च्या तेलाच्या बाबतीत आपण अधिक स्वयंपूर्ण बनु ज्याचा महाराष्ट्राच्या जीडीपी ला देखील थेट लाभ होईल देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात नंबर एक वर पोचेल कच्चे तेल स्वस्त मिळाल्याने महागाईवर नियंत्रण मिळवायला मदत होईल असे अनेक दूरगामी फायदे या प्रकल्पामुळे होतील.

नुकसान काय होईल ? तर एकूण 17 गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे आज या जमिनीवर सध्या शेती केली जाते आंब्याचे उत्पन्न घेतले जाते रोजगाराचा विचार केला तर या उत्पन्नातून त्या शेतकऱ्याच्या स्वतःचे घर देखील भागत नाही त्यामुळे प्रत्येक गावातील लोक मुंबईत येऊन रोजगार शोधतात. फायदा व नुकसान यांचे गणित मांडल्यास प्रकल्प होणेच फायद्याचे आहे हे कुणीही सांगू शकेल. एक लाख रोजगार देणाऱ्या या प्रकल्पामुळे नाणार हे मोठ्ठ शहरच होणार आहे भविष्यात भारताच्या नकाशावर हे महत्वाचे शहर म्हणून देखील ओळखले जाईल.

कोकणच का ? विदर्भात करा ना हा अत्यंत बालिश प्रश्न ठरतो रिफायनरी साठी महत्वाची असते ती समुद्रमार्गे होणारी वाहतूक आणि तो समुद्र विदर्भात नाही तेव्हा महाराष्ट्रात प्रकल्प व्हावयाचा असेल तर तो फक्त कोकणातच होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील विरोध करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनो तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी पुढच्या शंभर वर्षात जो कोकणाचा विकास तुम्ही करू शकणार नाही त्यापेक्षा कैकपट अधिक या प्रकल्पाने होणार आहे . तुमचे मुंबईत बसून ऑपरेट करणारे घरघुसे नेते यांचा या विषयाबाबत कवडीचाही अभ्यास नाही त्यांना त्यांची राजकीय पोळी तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याशी खेळून शेकायची आहे.

उद्या समजा स्थानिकांच्या विरोधामुळे समुद्र किनारा असलेल्या इतर राज्यांनी जर हा प्रकल्प नेला तर पुन्हा हेच नेते प्रकल्प पळवला असे म्हणून गळे काढायला तयार असतील पण त्यात सर्वात जास्त नुकसान कोकणी माणसाचे व महाराष्ट्राचे होईल.

विश्वजीत देशपांडे
समाजमाध्यमावरून साभार.

Leave a Reply