गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुडगूस, वृध्द व्यक्तीला पायाखाली तुडवून केले ठार

गडचिरोली : ६ नोव्हेंबर – काही दिवस गोंदिया जिल्ह्यात धुडगूस घातल्यानंतर पुन्हा एकदा रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात परतला. या कळपाने एका वृध्द व्यक्तीला पायाखाली तुडवून ठार केले. धनसिंग टेकाम (७१ रा. तलवारगड) असे मृत व्यक्तीचे नाव असून हत्तींनी हल्ला केला तेव्हा ते घरी झोपून होते
कोरची तालुक्यात मागील दोन दिवसांपासून रानटी हत्तींची दहशत आहे. वनविभागदेखील या कळपावर नजर ठेऊन आहे. अशातच शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास २० हत्तींच्या कळपाने तलवारगड गावात प्रवेश करून धुमाकूळ घातला. घरात झोपलेल्या धनसिंग टेकाम यांना हत्तींनी अक्षरशः पायाखाली तुडविले. हत्तींच्या हल्ल्यात वृद्धाचे शरीर चेंदामेंदा झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गावातील आठ घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच लागून असलेल्या न्याहाकल, टीपागड परिसरातील शेतीचे हत्तींनी प्रचंड नुकसान केले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या गावातील काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हत्तींनी हल्ला करून याच परिसरातील वृध्द महिलेला जखमी केले होते. कुरखेडा-कोरची मार्गावर दुचाकीवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Leave a Reply