वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती बिघडली

चंद्रपूर : ५ नोव्हेंबर – वांगे समजून एका कुटुंबाने विषारी असलेल्या धोतरा फळाची भाजी खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. घोतरा फळाची भाजी खाल्ल्यामुळं एकाच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोंडपिपरी ग्रामिण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होतं मात्र परिस्थिती आटोक्यात न आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात ही घटना घडली आहे. किसन खांडरे, रेखा तुळशिराम खांडरे, कमला नेवारे, सिताबाई किसन खांडरे, रिया सरवर अशी रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या परिसरात धोतराच्या झाडाला लागलेले फळ हुबेहूब वांग्यासारखे दिसले. वांगे समजूनच गावातील खंडारे कुटुंबातील महिलांनी ही फळभाजी तोडून भाजी बनवली आणि रात्रीच्या जेवणासाठी खाल्ली.
भाजी खाल्ल्यानंतर त्यांना रात्रीच्या सुमारास त्रास जाणवू लागला. पोटात मळमळ आणि उलटी सुरू झाली. खंडारे कुटूंबातील पाचही जणांना सारखाच त्रास जाणवायला लागल्याने वांग्यासारखी दिसणारी फळभाजी केल्याचे समोर आले. विषारी धोतऱ्याची भाजी असल्याचे समजताच पाचही व्यक्तींना उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शरिरात अधिक प्रमाणात विष गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply